अनेकांचे मोबाइल गहाळ; कार्यक्रम भव्य, पण नियोजनातील त्रुटी उघड
शिवाजी महाराज आणि त्यांच्यामागून धावणारे मावळे हे आपण इतिहासाच्या पुस्तकात किंवा ऐतिहासिक चित्रपटात पाहिलेले चित्र सोमवारी गिरगाव चौपाटीवर प्रत्यक्षात पाहावयास मिळाले. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहानिमित्त आयोजित महाराष्ट्र रजनी कार्यक्रमस्थळी रविवारी सायंकाळी मंचाला लागलेल्या आगीनंतर मंचावरील आणि मंचामागील कलाकारांनी आपल्या वेशभूषेतच बाहेर धाव घेतली. यामध्ये लावणीच्या कार्यक्रमानंतर शिवराज्याभिषेक सोहळय़ाचे सादरीकरण करण्यासाठीचा वेशभूषेत तयार असलेल्या चमूचा समावेश होता.
काहींचे सामान हे व्यासपीठाजवळच राहिले होते. पण आग शांत झाल्यावर आपले सामान शोधण्यास गेलेल्यांपैकी काहींचे सामान मात्र घटनास्थळाहून गायब झाले होते. यात काहींचे मोबाइल बॅगेतून गहाळ झाल्याच्याही घटना घडल्या. त्यामुळे कार्यक्रमाला आलेल्या पाच हजारांहून अधिक प्रेक्षकांमध्ये नव्हे तर कलाकार मंडळींमध्ये हलकल्लोळ माजला होता. आगीमुळे कलाकारांची धावपळ सुरू असतानाच आगीपासून सुरक्षित अंतरावर असलेले प्रेक्षक मात्र आगीचे छायाचित्र आणि तेथे सेल्फी काढण्यात मग्न होते.
पोलिसांसोबत खटके
मेक इन इंडिया उपक्रमाच्या भव्यतेला साजेसाच महाराष्ट्र रजनी या कार्यक्रमाचा मंच व तशीच भव्य रूपरेषा आखण्यात आली होती. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वत: या मंचाची निर्मिती केली होती. राज्यपालांसह, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, अमिताभ बच्चन, आमिर खान यांसह बाहेरील देशांचे प्रतिनिधी व मोठय़ा संख्येने अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांच्या दर्जाला साजेसे रूप या सांस्कृतिक संध्येला आले होते. पण सुरुवातीपासूनच नकारघंटा लागलेल्या या कार्यक्रमात नंतरही त्रुटी दिसून आल्या. कार्यक्रमाला प्रवेश करताना बॅगा व सामान नेण्यास प्रवेश नाकारला गेल्याने अनेकांचे सुरुवातीलाच पोलिसांशी खटके उडत होते. अनेक जण पोलिसांशी हुज्जत घालत होते.
ढिसाळ नियोजन
पुढे कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आमिर खान, हेमा मालिनी यांना व्यासपीठावर पाचारण करण्यात आले. मात्र, दीप प्रज्वलनासाठी मेणबत्तीच उपलब्ध व्हायला वेळ गेल्याने मान्यवर ताटकळत उभे होते. दीप प्रज्वलनाच्या वेळी अभिनेता आमिर खानने मागेच थांबणे पसंत केले. अखेर सूत्रसंचालक विवेक ओबेरॉयने त्याला पुढे बोलवून घेतले. पुढे तर ज्या पुष्पगुच्छाने राज्यपालांचा गौरव झाला त्याच पुष्पगुच्छाने मुख्यमंत्र्यांचा गौरव करण्यात आला, तर उद्धव ठाकरेंना केवळ शाल देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे व मुख्यमंत्र्यांचे भाषण झाले पण राज्यपालांचे अध्यक्षीय भाषण न होताच उद्घाटनाचा कार्यक्रम संपुष्टात आला.
योग्य चाचपणी – विझक्राफ्ट
आपण ज्या व्यासपीठावरील आयोजनाबद्दल बोलत आहात त्याबद्दल पूर्ण माहिती घेऊनच आम्ही बोलू, असे विझक्राफ्टच्या कंपनीच्या अनुराधा चौधरी यांनी सांगितले. तसेच आग लागल्यानंतर आमच्या विझक्राफ्ट कंपनीचे कर्मचारी, आपत्ती निर्मूलन पथक व मुंबई पोलीस आदींनी व्यासपीठामागे असलेल्या कलावंतांना व समोरील प्रेक्षकांना सुरक्षित बाहेर काढले.

पोलिसांचा मुख्यमंत्र्यांना ‘सलाम’!
मुंबई : मेक इन इंडिया सप्ताह अंतर्गत गिरगाव चौपाटीवर कार्यक्रम सुरू असताना मंचावर भीषण आग भडकलेली असतानाही, सर्वाना सुरक्षित ठिकाणी नेईपर्यंत तेथेच थांबण्याचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाडसाचे मुंबई पोलिसांनी कौतूक केले आहे. मुख्यमंत्री तसेच अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची धावाधाव सुरू झाली.सहआयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची विनंतीही केली, परंतु ती साफ नाकारली. शेवटची व्यक्ती सुरक्षित बाहेर पडेपर्यंत आपण येथेच थांबणार असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे बजावले, याबद्दल ‘मुंबई पोलिसांतर्फे मुख्यमंत्र्यांना सलाम’.. अशा शब्दांत पोलीस आयुक्तांनी ट्वीटद्वारे मुख्यमंत्र्यांची प्रशंसा केली आहे.

अग्निशमनचा अहवाल आज
* ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात लागलेल्या आगीचा अहवाल मंगळवारी अग्निशमन दलाकडून सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
* या आगीत संपूर्ण व्यासपीठ जळून खाक झाले. आग आटोक्यात आल्यानंतर खाक झालेल्या व्यासपीठाच्या आजूबाजूला पसरलेले जळके अवशेष पालिकेच्या सुमारे साडेचारशे कर्मचाऱ्यांनी रात्रभर काम करून हटवले. यावेळी महापालिका आयुक्त अजय मेहता आणि अन्य वरिष्ठ पालिका अधिकारी उपस्थित होते.
* हे साहित्य हटविण्यासाठी ३२ डंपर, ८ जेसीबी, पाच मेटल कटर, १ गॅस कटरच्या साहाय्याने जळालेले अवशेष हटविण्यात आले. यासाठी वाहनांच्या ६२ फेऱ्या झाल्या.
* सकाळी साडेसहा वाजता हे काम पूर्ण झाले. ८० फूट लांबीचे व ४० ते ५० फूट उंची असलेल्या या व्यासपीठासाठी किंमती साहित्याचा वापर करण्यात आला होता. आगीमुळे सुमारे १० कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
* व्यासपीठावर साऊंड, लाईट सिस्टीम आदीसाठी असलेल्या दोन क्रेननाही आगीच्या झळा बसल्या. आग मोठी असल्याने या क्रेनच्या चाकांवरील रबर जळाल्याने लोखंड जमिनीत रुतले आहे. दुसऱ्या क्रेनच्या साहाय्याने या क्रेन्स हटविण्यात येणार आहेत. जळून निकामी झालेल्या या क्रेन कधीही कोसळण्याची शक्यता आहे.

पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेमुळे अनर्थ टळला
मुंबई : महाराष्ट्र रजनी कार्यक्रमादरम्यान रविवारी सायंकाळी लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी न झाल्यामागे पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेचा मोलाचा वाटा असल्याचे आता स्पष्ट होत आहे. कार्यक्रमापूर्वी दोन दिवस मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण विभागाने आयोजकांना सुरक्षेच्या दृष्टीने कार्यक्रमस्थळी अनेक बदल सुचवत नियोजनाचा आराखडा दिला होता. या बदलांचे पालन झाल्याने भीषण आगीचे वेळी मानवी हानीचा मोठा अनर्थ टळला. आपत्कालिन यंत्रणेच्या आराखडय़ाप्रमाणे नियोजन झाले नसते तर मात्र मोठी हानी अटळ होती हे आता या भिषण आगीनंतर दिसून येत आहे.
मेक इन इंडीया सप्ताहातील मोठा कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम गिरगाव चौपाटी येथे शासनातर्फे आयोजित करण्यात आला होता. मात्र, येथे लागलेल्या मोठय़ा आगीत कार्यक्रमाचा मंच जळून खाक झाला. यावेळी व्यासपीठामागे व समोर अनेक प्रेक्षक, कलावंत व मान्यवर उपस्थित होते. या सगळय़ांनाच मुंबई पोलीस व मुंबई पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण विभागाने सुरक्षित बाहेर काढल्याने जिवीतहानी टळली. मात्र, आयोजकांना आपत्कालीन नियंत्रण विभागाने योग्यवेळी दिलेल्या नियोजन आराखडयामुळे हे शक्य झाले. असाच आराखडा मुंबई पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण विभागाकडून महाराष्ट्र रजनी कार्यक्रमाच्या आयोजकांना दिला होता. असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले.

कार्यक्रमस्थळी ऐनवेळी सूचना देण्यासाठी उद्धोषणा करण्याचे केंद्रही स्थापण्यास सांगितले होते. त्यामुळे दुर्घटनेनंतर पोलिसांना व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक महत्त्वाच्या सूचना देणे शक्य झाले. घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाच्या गाडय़ा पाहचू शकल्या. या सुनियोजित कार्यवाहीमुळचे चेंगरा-चेंगरी व जिवीतहानी टळली.

‘बीकेसी’ प्रदर्शनस्थळाची पुन्हा पाहणी
मुंबई : गिरगाव चौपाटीवर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी लागलेल्या आगीच्या पाश्र्वभूमीवर वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘मेक इन इंडिया’ प्रदर्शनस्थळाची आग प्रतिबंधक पाहणी सकाळी करण्यात आली.
प्रदर्शनस्थळाची आग प्रतिबंधक पाहणी आधी करण्यात आली होती, पण चौपाटीवरील आगीमुळे कोणताही धोका नको म्हणून सोमवारी सकाळी पुन्हा पाहणी करण्यात आली, असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी सांगितले.
आग प्रतिबंधक उपाय म्हणून नव्याने काही खबरदारी घेण्यात आली. कोणताही धोका नको म्हणूनच ही पाहणी पुन्हा करण्यात आल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. ढिसाळ नियोजनामुळेच ‘मेक इन इंडिया’चे ‘शेम ऑन इंडिया’ झाल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्य सरकारवर केली. या आगीची सखोल चौकशी होऊन संबंधितांच्या विरोधात कारवाई व्हावी, असी अपेक्षा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.