गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना काही प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कारण, मध्य रेल्वेने गणेश चतुर्थीनिमित्त रविवारप्रमाणे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, रविवारी सोडण्यात येणाऱ्या लोकप्रमाणेच फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. परिणामी काही लोकल धावणार नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

रेल्वे सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना गणेशसेवेची संधी उपलब्ध होण्यासाठी सुट्ट्यांचे नियोजन करण्यासाठी हा बदल केल्याची शक्यता आहे. मात्र, गणेश चतुर्थीच्या दिवशी रविवार वेळापत्रकाप्रमाणे गाड्या सोडण्याचे जाहीर केल्याने प्रवाशांना त्रासास सामोरे जावे लागणार आहे. रविवारच्या ब्लॉक काळात मध्य रेल्वेवर ३० टक्के कमी लोकल फेऱ्या चालविल्या जातात. घरगुती गणपतीबरोबरच मुंबईतील मोठय़ा सार्वजनिक गणपतींचेही पहिल्याच दिवशी दर्शन घेण्यासाठी नागरिक बाहेर पडतात. प्रवाशांची संख्या वाढते. त्यांना कमी लोकलफेऱ्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेने आगाऊ सूचना दिली असून त्याप्रमाणे प्रवासाचे नियोजन करावे लागेल.