शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीला शह देण्यासाठी भाजपच्या पुढाकाराने सोमवारी महाराष्ट्र गणेशोत्सव समन्वय महासंघाची स्थापना करण्यात आली असून महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली. मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आपल्याकडे वळविण्यासाठी महासंघातर्फे निरनिराळ्या योजना आणि उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवात रस्त्यावर मंडप उभारण्यास न्यायालयाने बंदी केल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. या संदर्भात भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीस बृहन्मुंबई सार्वजनिक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते. परंतु बैठकीस भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी पाहून समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीस समन्वय समितीचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहिले होते. परिणामी समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर आणि भाजप नेते आशीष शेलार यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. या पाश्र्वभूमीवर भाजप नेत्यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाची स्थापना करीत शिवसेना आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
महासंघाच्या अध्यक्षपदी जयेंद्र साळगावकर, उपाध्यक्षपदी मुक्त टिळक, कार्याध्यक्षपदी संजय यादवराव आणि प्रमुख कार्यवाहपदी सुरेश सरनोबत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघातर्फे यंदा ‘श्री गणेश गौरव पुरस्कार-२०१५’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मंडळांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महासंघामार्फत शासनदरबारी आणि प्रशासनाशी समन्वय साधण्यात येईल, असे महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. महासंघाच्या स्थापनेची घोषणा झाल्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली जयेंद्र साळगावकर, मुक्त टिळक, संजय यादवराव, सुरेश सरनोबत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समजते.