मुंबईतील रुग्णवाढीचा दर कमी होत असून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्यादेखील दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. त्याचबरोबर दरदिवशी नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णांपेक्षा  दरदिवशी करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही घटू लागली आहे. मंगळवारी ९१७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील करोनारुग्णवाढीचा सरासरी दर ०.७९ टक्कय़ांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ८८ दिवसांवर गेला आहे. मंगळवारी ९१७ नवीन रुग्ण आढळले असून एकूण बाधितांचा आकडा १ लाख २५ हजार २३९ वर गेला आहे. १,१५४ रुग्ण एका दिवसात बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ९९ हजार १४७ रुग्ण म्हणजेच ७९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत सध्या १८ हजार ९०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी केवळ ५,३८२ रुग्णांत करोनाची लक्षणे आहेत. त्यापैकी ११०० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. मुंबईतील करोना उपचार केंद्रांतील खाटा मोठय़ा संख्येने रिक्त आहेत. त्याचबरोबर एकेकाळी अतिदक्षता विभाग किंवा कृत्रिम श्वसन यंत्रणासुद्धा पूर्णपणे व्यापलेल्या असताना आता मात्र या खाटादेखील मोठय़ा संख्येने रिक्त असल्याचे चित्र आहे. अतिदक्षता विभागाच्या ३५८ खाटा, प्राणवायूसह असलेल्या ५,३०५ व व्हेंटिलेटरच्या १७५ खाटा सध्या रिक्त आहेत.

वाढत्या मृत्यूदरामुळे चिंता

वाढता मृत्यूदर ही मात्र मुंबईला भेडसावणारी मोठी चिंता आहे. मंगळवारी ४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी ३३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यात ३७ पुरुष व ११ महिला होत्या. २५ रुग्णांचे वय ६० वर्षांहून अधिक होते. मृतांचा एकूण आकडा ६,८९० वर गेला आहे. त्यापैकी ५,६५० रुग्णांचे वय हे ५० वर्षांहून अधिक होते.

राज्यात आणखी ११ हजार रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ११ हजार नवे रुग्ण आढळले तर २५६ जणांचा मृत्यू झाला.  करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच दिवसभरात १० हजारांपेक्षा अधिक रुग्णांना घरी पाठविण्यात आले. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ५ लाख ३५ हजार झाली. आतापर्यंत राज्यात करोनामुळे १८,३०६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या १ लाख ४८ हजार रुग्ण उपचाराधीन असून, त्यात पुणे जिल्ह्य़ातील सर्वाधिक ४० हजार रुग्णांचा समावेश आहे.  पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या तुलनेत कमी झाली असली तरी कोल्हापूर आणि नगर जिल्ह्य़ांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे.