आघाडीची चर्चाच न झाल्याने राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

गुजरातमध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दर्शवूनही अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी विरोधात भूमिका घेतल्यानेच राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याचे काँग्रेसने जाणीवपूर्वक टाळले आहे. काँग्रेसने प्रतिसाद न दिल्याने राष्ट्रवादीला स्वबळावर लढण्याशिवाय आता पर्याय नाही.

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची राष्ट्रवादीची तयारी होती. तसे संकेत शरद पवार यांनी गेल्याच आठवडय़ात दिले होते. गेल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांनी अहमद पटेल यांना मदत केली नव्हती. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, असा निर्णय पक्षाने घेतला होता, असे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला नऊ जागा सोडल्या होत्या. या नऊ जागांबरोबरच आणखी तीन-चार जागा मिळाव्यात, अशी राष्ट्रवादीची मागणी होती. नऊ जागाही देणे शक्य होणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याने जागावाटपाची चर्चा होणे शक्यच नव्हते, असे राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. समविचारी मतांचे विभाजन टाळण्याकरिता आघाडीची राष्ट्रवादीची तयारी होती, पण काँग्रेसची तशी इच्छाच दिसली नाही, असेही पटेल यांनी स्पष्ट केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन आमदार निवडून आले होते.

राष्ट्रवादीबरोबर आघाडीशी चर्चा करण्याचा प्रस्ताव चर्चेत आला होता. काँग्रेसबरोबर आघाडीत निवडून येणारे राष्ट्रवादीचे आमदार बरोबर राहतील याची काहीही हमी देता येत नाही. हे अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी स्पष्ट झाले होते. राष्ट्रवादीपेक्षा हार्दिक पटेल किंवा जनता दल (यू) यांच्यात विजयाची शक्यता जास्त आहे, असे काँग्रेसच्या एका नेत्याने स्पष्ट केले.

काँग्रेसने नाकारल्याने राष्ट्रवादी आता स्वबळावर लढणार आहे. राष्ट्रवादी अन्य कोणाशी आघाडी करणार नाही. स्वबळावर नशीब अजमाविले जाईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या ७७ उमेदवारांच्या यादीत पासचे दोघेच

  • पाटीदार आंदोलकांमध्ये नाराजी

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रविवारी रात्री उशिरा आपल्या ७७ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. या यादीत पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या (पास) केवळ दोन सदस्यांना उमेदवारी देण्यात आल्याने पास नाराज झाल्याचे वृत्त आहे.

पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने काँग्रेसकडे २० जागांची मागणी केली होती. ललित वसोया आणि अमित थुम्मर या दोघांच्याच नावांचा समावेश काँग्रेसच्या पहिल्या यादीत करण्यात आला आहे. यामुळे नाराज झालेल्या पासच्या नेतृत्वाने वसोया आणि थुम्मर यांना उमेदवारी अर्ज सादर न करण्याचे आदेश दिले. तथापि, वसोया यांनी ध्रोआजी येथून उमेदवारी अर्ज भरला.  मात्र, हार्दिक पटेलने आपला राजकोटमधील मेळावा रद्द केला आहे, या मेळाव्यात हार्दिक पटेल काँग्रेसला पाठिंबा जाहीर करणार होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत ‘पास’च्या दोन सदस्यांसह पटेल समाजातील २०हून अधिक उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. यादी जाहीर होताच ‘पास’च्या संतप्त सदस्यांनी राज्याच्या अनेक भागांत निदर्शने केली, आपल्याला योग्य प्रतिनिधित्व देण्यात आले नसल्याचा दावा ‘पास’ने केला. सुरतमध्ये ‘पास’ने काँग्रेसच्या शहर कार्यालयावर हल्ला केला आणि काँग्रेसविरोधी घोषणाबाजीही केली. राज्यात काँग्रेसच्या एकाही कार्यालयातील कारभार आम्ही चालू देणार नाही, असेही‘पास’ने जाहीर केले.

  • अहमदाबादमध्ये ‘पास’चे निमंत्रक दिनेश भांबानिया यांनी समर्थकांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांच्या निवासस्थानी गोंधळ घातला.
  • काँग्रेस पक्षाने अनेक ठिकाणी पोलिसांना पाचारण केले. पालडी परिसरात असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.