राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेमागे एका हवाला हस्तकाची जबानी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कोटय़वधी रुपयांची रोकड भुजबळांच्या सनदी लेखापालांनी आपल्याकडे दिली आणि ती आपण कोलकत्ता येथील बनावट कंपन्यांना पुरविली, अशा या हस्तकाने दिलेल्या जबानीमुळेच भुजबळांकडे कोटय़वधी रुपयांची रोकड होती, हे स्पष्ट झाल्याचा दावा महासंचालनालयाने केला आहे.
महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स या दोन प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केल्यानंतर सक्तवसुली महासंचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल केले. एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्य़ांच्या आधारेच सक्तवसुली महासंचालनालयाने तपास सुरू केला. महाराष्ट्र सदन प्रकरणात मे. के. एस. चमणकर इंटरप्राईझेसशी संबंधित तब्बल १७ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली. त्यानंतर भुजबळ कुटुंबीयांशी संबंधित ११४ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली. भुजबळांशी संबंधित असलेल्या कंपन्यांच्या विविध खात्यांची तपासणी सुरू केली तेव्हा मोठय़ा प्रमाणात रकमांची नोंद आढळून आली. त्याबाबत सनदी लेखापालांकडे चौकशी करण्यात आली. कोलकता येथील कंपन्यांची नावेही चौकशीत पुढे आली आणि त्यातूनच हवाला हस्तकाचे नावही बाहेर आले. या हवाला हस्तकालाही चौकशीसाठी बोलाविण्यात आले. त्यातूनही बरीचशी महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतरच सक्तवसुली महासंचालनालयाने समीर व पंकज यांच्यावर समन्स बजावले. समीरकडे चौकशी केल्यानंतरही नीट उत्तरे न मिळाल्याने छगन भुजबळ यांच्याकडे विचारणा करण्यात आली. परंतु आपल्याला काहीही माहीत नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्यानेच त्यांना अटक करण्यात आल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
भुजबळ यांची पोलीस कोठडी मिळण्यासाठी महासंचालनालयाने विशेष न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अर्जात हवाला हस्तकाचा उल्लेख केलेला नाही. मात्र या शासकीय कंत्राटांच्या मोबदल्यात भुजबळ यांना मोठय़ा प्रमाणात रोखीने रक्कम मिळाली आणि ही रक्कम कोलकत्ता येथील बनावट कंपन्यांना हस्तांतरित करून धनादेश घेण्यात आले, असे नमूद आहे. हवाला हस्तकाकडून बरीच माहिती मिळाली असून त्याद्वारे काही पुरावेही हाती लागल्याचे या सूत्रांनी सांगितले. भुजबळ कुटुंबीयांच्या विविध कंपन्यांवर स्वत: छगन भुजबळ हे कुठेही संबंधित नसले तरी शासनातील त्यांचे पद पाहता कोटय़वधी रुपयांची रोकड त्यांना कुठून मिळाली तशीच त्या रोख रकमेचे त्यांनी काय केले आदी मुद्दय़ांची आता चौकशी केली जाणार आहे. समीर व पंकज यांनी व्यवसायातून माया कमविली असा दावा केला असला तरी कागदपत्रांकडून त्याचा मेळ लागून येत नाही.

तेलगीप्रकरणी भुजबळ यांच्या चौकशीच्या
मागणीस पृथ्वीराजबाबांचा पाठिंबा!
मुंबई : तेलगी घोटाळ्यातील बनावट मुद्रांक माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील घरात सापडल्याचा आरोप या घोटाळ्यात चार वर्षे तुरुंगाची हवा खाऊन आलेले भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी विधानसभेत करताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चक्क त्याला पाठिंबा दिल्याने सभागृहात अनेकांच्या भुवया उंचावल्या.
बनावट मुंद्राक सापडल्याबद्दल एका लक्षवेधीवरील चर्चेत सहभागी होताना गोटे यांनी तेलगी घोटाळ्यात भुजबळांचा सहभाग होता, असा आरोप केला. विशेष म्हणजे गोटे यांना ‘मोक्का’ अन्वये तेलगी घोटाळ्यात अटक झाली होती. भुजबळांवरील आरोपांबाबत सध्या काही माहिती नाही, पण त्याची माहिती घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावर चौकशी होणार असल्याने ही लक्षवेधी राखून ठेवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सत्तेत असताना पृथ्वीराजबाबा आणि भुजबळ यांच्यात कधीच पटले नव्हते. चव्हाण यांनी भुजबळांना अडचणीत आणल्याने त्याची चर्चा सुरू झाली होती.