राज्यातून भाज्यांची आवक घटली; ग्राहकांचा प्रतिसादही निम्मा

मुंबई : मुंबई किनारपट्टीजवळून सोमवारी घोंघावत गेलेल्या तौक्ते चक्रीवादळाचे पडसाद भाजीबाजारांवरही उमटले. रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने बाजारात येणाऱ्या ग्राहकांना घरातच थोपवले.  सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस सरू झाल्याने ग्राहक आणि किरकोळ विक्रे ते बाजारात फिरकलेच नाहीत. मंगळवारीही काहीशी अशी परिस्थिती होती. ग्राहकांचा निम्मा प्रतिसाद मिळाल्याने व्यापाऱ्यांना बऱ्याच भाज्या फेकून द्याव्या लागल्या.

चक्रीवादळाने सोमवारी धुमाकू ळ घातल्यानंतर त्याचे पडसाद रविवारी ग्रामीण भागात उमटले.  राज्यातील विविध भागांतून येणाऱ्या भाज्यांची आवक सोमवारीच घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी भाज्या कमी येतील असा अंदाज बांधून व्यापाऱ्यांनी आधीच जास्त भाज्या खरेदी केल्या होत्या. परंतु सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने ग्राहक आणि किरकोळ विक्रेते बाजारपेठेत फिरकले नाहीत. ‘पहाटेच्या वेळेत जे ग्राहक आले तेवढाच काय तो व्यापार झाला. नंतर पावसाने जोर धरल्याने ग्राहक फिरकलेच नाहीत. अन्य दिवसांच्या तुलनेत केवळ २५ टक्केच ग्राहक सोमवारी बाजारात आल्याचे दादर येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.’

राज्यातील विविध भागांमधून दादर येथील सेनापती बापट मार्ग आणि प्लाझा सिनेमा येथील बाजारपेठेत जवळपास २०० गाडय़ा भाजीपाला घेऊन येतात. सोमवारी पावसाच्या तडाख्यात भाजीपाल्याचे बरेच नुकसान झाल्याने मंगळवारी अंदाजे ८० गाडय़ाच दादर येथे आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. ‘सोमवारी आणलेल्या भाज्याच मंगळवारी विकण्याची वेळ घाऊक व्यापाऱ्यांवर आली. हीच अवस्था किरकोळ व्यापाऱ्यांची होती. त्यामुळे मंगळवारीही बाजारात ग्राहक आले नाही. परिणामी राज्यभरातून आलेल्या भाज्यांचा पुरेसा खप झाला नाही’अशी माहिती व्यापारी अक्रम यांनी दिली.

आंब्यावरही परिणाम

‘गेले तीन दिवस बाजारात कोकणातून आंबाच आलेला नाही. येत्या आठवडय़ातही अशीच परिस्थिती असेल. आंब्याला फटका बसल्याने या हंगामातील ६० टक्के आंबा वाया गेला. तसेच विमान सेवा विस्कळीत झाल्याने परदेशी निघालेला आंबाही वेळेत पोहचू शकला नाही,’ असे आंबा व्यापारी अशोक हांडे यांनी सांगितले.

पावसामुळे गावाहून येणाऱ्या भाज्या आणि मुंबईतील व्यापार यावर परिणाम झाले. शेतमालाची आवक मंगळवारी घटली होती. तर भाज्या विकल्या न गेल्याने व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले. गेले दोन दिवस बाजारात निम्मेही ग्राहक फिरकले नाहीत.

सिद्धार्थ गडदे, व्यापारी