केंद्रीय मंत्र्यांची घोषणा; राज्यात आठ विभागीय उपचार केंद्र

देशभरात हेपेटायटिसच्या नियंत्रणासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार असून २०३० पर्यंत देशातून हेपेटायटिसचे समूळ उच्चाटन करण्यात येईल. यासाठी जागरूकता, प्रतिबंध, निदान, उपचार या माध्यमांतून देशव्यापी चळवळ उभारण्याचा निर्धार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी व्यक्त केला.

देशात हेपेटायटिस बीचे सुमारे चार कोटी रुग्ण, तर हेपेटायटिस सीचे जवळपास एक  कोटी २० लाख रुग्ण आहेत. हेपेटायटिस नियंत्रणासाठी राज्यात आठ विभागीय उपचार केंद्र सुरू करून राज्यात राष्ट्रीय व्हायरल हेपेटायटिस कार्यक्रम सुरू करण्यात आला. लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी अश्विनीकुमार चौबे यांच्या हस्ते हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभाग सचिव डॉ. संजीव मुखर्जी, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

हेपेटायटिसबद्दल अधिकृत माहिती व रुग्णांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून टोल फ्री क्रमांक १८००-११-६६६६ आजपासून सर्वत्र कार्यान्वित करण्यात आल्याची घोषणा याप्रसंगी करण्यात आली.

  • हेपेटायटिसने ग्रस्त असलेल्या रुग्णांना यकृताचे आणि कर्करोगासारखे आजार होऊ शकतात. राज्यात हेपेटायटिसच्या उपचारासाठी औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शीव येथील लोकमान्य टिळक मनपा रुग्णालयात सेवेचा केंद्रबिंदू असणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.