प्रसाद रावकर

मुंबई महापालिकेचा अभ्यास सुरू  

गेल्या गुरुवारी कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील हिमालय पादचारी पुलाच्या जागी नवा पूल बांधण्याचा विचार महापालिका प्रशासन करीत असून त्याबाबतचा अभ्यास अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. हा अभ्यास १५ दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दादाभाई नौरोजी मार्गावरील बी. टी. लेन येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये जाणारा पादचारी पूल (हिमालय पूल) गेल्या गुरुवारी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांना प्राण गमवावे लागले, तर ३० जण जखमी झाले. या दुर्घटनेमुळे दादाभाई नौरोजी मार्गावरील वाहतूक बंद करावी लागली होती.

शुक्रवारी हिमालय पुलाचा उरलासुरला भाग पाडून टाकला आणि शनिवारी दादाभाई नौरोजी मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. प्रवाशांची अडचण होऊ नये यासाठी बी. टी. लेनसमोरील रस्त्यावरील दुभाजक हटविण्यात आले असून तेथे सिग्नल बसविण्यात आला आहे. मोठय़ा संख्येने प्रवासी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये जा-ये करतात. त्यामुळे नौरोजी मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

प्रवाशांना सुरक्षितपणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये जाता यावे आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात निघावा यासाठी पालिका प्रशासनाने आता हिमालय पुलाच्या जागी नवा पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या ठिकाणी नेमका कोणत्या स्वरूपाचा पूल बांधायचा, असा यक्षप्रश्न पालिकेसमोर आहे.  येथे कोणत्या स्वरूपाचा पूल उभारावा याचा अभ्यास करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पूल विभागाला दिले आहेत. त्यानुसार अभियंत्यांनी अभ्यास सुरू केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या किती, दादाभाई नौरोजी मार्गावरून किती गाडय़ा धावतात, वाहतुकीचे नियमन कसे होते, तसेच किती क्षमतेचा पूल उभारण्याची गरज आहे, आदी बाबींचा अभ्यास पूल विभागातील अधिकारी करीत आहेत. येत्या १५ ते २० दिवसांत अभ्यास पूर्ण करण्याचे निर्देश या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

दुर्घटनेप्रकरणी नवी याचिका

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेरील ‘हिमालय’ पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी, तर जखमींना प्रत्येकी २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. अ‍ॅड्. व्ही. पी. पाटील यांनी ही याचिका केली असून या आठवडय़ात ती सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. खोटा संरचनात्मक परीक्षणाचा अहवाल सादर केला गेल्यानेच ही दुर्घटना घडली आणि त्यात सहा निष्पाप नागरिकांचा बळी गेला, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेत मुख्यमंत्री, पालिका आयुक्त, रेल्वेचे व्यवस्थापक आणि मुंबईच्या महापौरांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.

हिमालय पुलाच्या जागी नवा पूल बांधण्याबाबत अभ्यास करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

– अजोय मेहता, पालिका आयुक्त