अंतर्गत चौकशीत घोटाळा उघड

पोलिसांच्या मदतीसाठी गृहरक्षक दलाचे जवान तैनात केले जात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात असंख्य जवान कामावर हजर न राहताच आपला भत्ता लाटत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. या प्रकरणी अंतर्गत चौकशी करण्यात आलीअसून त्यात हा घोटाळा उघड झाल्यामुळे गुन्हा दाखल केला जाणार आहे. विविध पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी-अधिकारी त्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

राज्यात सुमारे ३८ हजार गृहरक्षक दलाचे जवान असून त्यांच्यावर वार्षिक भत्त्यापोटी शासन १२० कोटी रुपये खर्च करते. प्रत्येक जवानाला प्रतिदिन ४०० रुपये भत्त्यापोटी दिले जातात. विविध सण तसेच परीक्षा आणि रेल्वेतील बंदोबस्तासाठी या जवानांची मदत घेतली जाते. या जवानांना या कामासाठी भत्ता दिला जातो. विविध ठिकाणी त्यांनी काम केल्याचे प्रमाणपत्र संबंधित पोलीस ठाणे वा यंत्रणा देत असते. या प्रमाणपत्रामुळेच जवानांना भत्ता मिळतो. परंतु यापैकी अनेक जवान हे खासगी नोकरी करीत आहेत. बंदोबस्तासाठी हजर राहण्यासाठी ते सुट्टी घेतात वा त्यांना सवलत मिळते. परंतु बऱ्याच प्रकरणात खासगी नोकरी करीत असलेले असंख्य जवान हे एकाचवेळी दोन्ही ठिकाणी हजर दिसल्यामुळे हा घोटाळा उघड झाला. हे मोठे रॅकेट असल्याची निनावी माहिती काही तपशीलान्वये गृहरक्षक दलाला सादर करण्यात आली होती. त्यामुळे या माहितीची शहानिशा करण्यासाठी अंतर्गत चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीला अनेक घोटाळे आढळून आले.

काही जवान एकाचवेळी दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदोबस्ताच्या डय़ुटीवर असल्याचे आढळून आले. तरीही त्यांना काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. या प्रमाणपत्राच्या मोबदल्यात संबंधित पोलिसांना टक्केवारी दिली जात होती. अनेक वर्षे हा घोटाळा मोठय़ा प्रमाणात सुरु असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी हजेरी नोंदणी पत्रकाची तपासणी करण्यात आली तेव्हाही मोठय़ा प्रमाणात त्यात खाडाखोड असल्याचे आढळून आले. अनेकजण सही करून आपापल्या कामावर जात असल्याचेही दिसून आले. रेल्वे पोलिसांकडून विविध रेल्वे गाडय़ामध्ये महिलांच्या डब्यातील बंदोबस्तासाठी गृहरक्षक दलाच्या जवानांची मदत घेतली जाते. बऱ्याचवेळा डय़ुटीवर असूनही हा जवान गायब असल्याचे प्रकार घडले आहेत. त्यातही याच टक्केवारीची कमाल असल्याचे बोलले जात आहे. तूर्तास या तक्रारीत माहिम, दादर, मुंबई सेंट्रल, वरळी आणि विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याचे नाव घेतले जात आहे. काम केलेले नसतानाही बनावट प्रमाणपत्रे या पोलीस ठाण्यातून दिली गेली आहेत. सदर चौकशी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणी विधि खात्याकडून मत मागविण्यात आले असता या संदर्भात गुन्हा दाखल करण्यास सांगण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

असे प्रकार यापुढे घडू नयेत यासाठी आता काळजी घेण्यात येईल. असे प्रकार राज्यात अन्यत्र सुरू आहेत का याचीही चौकशी केली जाईल

– राकेश मारिया,

महासंचालक, गृहरक्षक दल