अप्रशिक्षित आयोजकांमुळे कासवाच्या पिल्लांचे हाल

गेल्या बारा वर्षांपासून कोकणातील वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर आयोजित होणाऱ्या कासव महोत्सवात पर्यटकांना आकर्षित करताना कासवांचे संवर्धन व जतन करण्याच्या दृष्टीने मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. काही ग्रामस्थांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या बळावर प्रशिक्षित कासवमित्रांची हकालपट्टी केल्यामुळे कासव संवर्धनाचा आणि महोत्सवाचा दर्जा घसरल्याचे चित्र दिसत आहे. पर्यटकांना नवजात कासवांच्या पिल्लांचे जवळून छायाचित्रण करावयास देणे, त्यांना हाताळण्याची संधी देणे, पिल्लांना समुद्रात सोडताना सुरक्षा नियमांची काळजी न घेण्यासारखे उद्योग अप्रशिक्षित आयोजकांकडून केले जात आहेत. विशेष म्हणजे कासवांच्या घरटय़ांचे योग्य पद्धतीने संवर्धन न झाल्याने काही पिल्लांना जीव गमवावा लागला आहे. निसर्गप्रेमी पर्यटकांच्या तक्रारीनंतर जाग आलेल्या वनविभागाने यामध्ये हस्तक्षेप केला.

चिपळूण येथील सह्य़ाद्री निसर्गमित्र मंडळाने २००२ साली महाराष्ट्रातील पहिला कासव संवर्धन प्रकल्प वेळासच्या समुद्रकिनाऱ्यांवर राबविला होता. कालांतराने ग्रामस्थांनी यामध्ये सहभागी होऊन संवर्धनाला महोत्सवाची जोड दिली. पिल्लांचा जन्म झाल्यानंतर त्यांना समुद्रात सोडण्याच्या कालावधीत कासव महोत्सवाच्या आयोजनाला २००६ पासून सुरुवात करण्यात आली. यंदा वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर १० मार्चपासून महोत्सवाची लगबग सुरू असून २१ कासवांची घरटी त्या ठिकाणी आहेत. मात्र यंदाच्या महोत्सवामध्ये घरटे आणि त्यातील पिल्लांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र प्रकर्षांने दिसत आहे. कॅमेऱ्याचे प्रखर दिवे लावून नवजात कासवाच्या पिल्लांचे छायाचित्रण पर्यटक करीत आहेत. पर्यटकांसमोर मृत कासवांची पिल्ले ठेवून त्यांची फसवणूक केली जात असल्याची माहिती एका ग्रामस्थाने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’ला दिली.

काही दिवसांपूर्वी समुद्रात कासवांच्या पिल्लांना सोडताना पर्यटकाने उडविलेल्या ड्रोन कॅमेऱ्यावरही आयोजक ग्रामस्थांनी हरकत न दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. कासवांच्या पिल्लांसाठी कॅमेऱ्यातून निघणारा प्रखर प्रकाश त्रासदायक असल्याची माहिती कासवतज्ज्ञ पशुवैद्य डॉ. दिनेश विन्हेरकर यांनी दिली. तसेच जन्मानंतर त्यांना विनाअडथळा तातडीने समुद्राच्या दिशेने रवाना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या सतरा वर्षांपासून संवर्धनाचे काम करणाऱ्या गावातील कासवमित्रांना प्रकल्पामधून हद्दपार केल्यामुळे संवर्धनाच्या कामाचा दर्जा घसरल्याची माहिती सध्या मुंबईत वास्तव्य करणारे ग्रामस्थ प्रीतम कुलापकर यांनी दिली. ग्रामसभेच्या वेळी कासवमित्रांना हद्दपार न करण्याचा मुद्दा आम्ही उपस्थित केला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावर कासव संवर्धनाचा प्रकल्प आणि महोत्सवात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होत नसल्याचा दावा आयोजक हेमंत सालदुरकर यांनी केला आहे. आमच्याविरुद्ध काही मंडळींचे हे कटकारस्थान असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. वनविभागाकडून देण्यात आलेल्या पत्रानंतर शनिवारी महोत्सवामध्ये सुरक्षा कुंपण लावून त्यामधून पिल्ले सोडल्याचे ते म्हणाले.

वेळास कासव महोत्सवाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर आयोजकांना संवर्धनाचा दर्जा सुधारण्याबाबत पत्र दिले आहे. वनविभागाचे कर्मचारी या प्रकल्पाक डे लक्ष ठेवून आहेत. पुढल्या वर्षांपासून शास्त्रीयदृष्टय़ा संवर्धनाचे काम होण्यासाठी मुलाखतीच्या माध्यमातून कासवमित्रांची निवड करण्यात येणार आहे.

सुरेश वरक, वन परिक्षेत्र अधिकारी