15 January 2021

News Flash

दळण आणि ‘वळण’ : वेळापत्रक आखणी वेळ आणि अंतराची लढाई!

गरज अधोरेखित झाली की, किती सेवा आणि नेमक्या कोणत्या वेळी हव्या आहेत, याकडे लक्ष दिले जाते.

पश्चिम मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत.

उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक ही सर्वसामान्य प्रवाशांच्या अगदी जिव्हाळ्याची गोष्ट! वेळापत्रकात जादा गाडय़ांचा समावेश करा इथपासून अमुक गाडी बंद का केली इथपर्यंत अनेक सूचना आणि तक्रारी या वेळापत्रकाबाबत मांडल्या जातात. पण हे वेळापत्रक तयार कसे होते, काय काय अडचणी येतात, कोणते घटक लक्षात घ्यावे लागतात? एक प्रवासी म्हणून हे जाणून घेणे आपल्यालाही गरजेचे आहे..

आपल्या आयुष्यातील बहुतांश वेळ तुम्ही कुठे घालवता, असा प्रश्न कोणत्याही मुंबईकराला विचारला तर ‘लोकल ट्रेनच्या प्रवासात’ हे उत्तर मिळेल. रेल्वेची ही उपनगरीय सेवा म्हणजे मुंबईकरांसाठी घरून ऑफिसला आणि ऑफिसहून घरी ने-आण करणारी १२ डब्यांची गाडी, एवढय़ापुरती मर्यादित नाही. अनेकांसाठी त्यांची ८.२१, ९.१३ची गाडी म्हणजे दुसरी दुनिया असते. दरवर्षी किंवा दोन वर्षांनी रेल्वेचे वेळापत्रक बदलते आणि या गाडय़ांच्या वेळाही बदलतात. मग मुंबईकर चुकचुकतात आणि बदललेल्या वेळापत्रकाला दूषणेही देतात. पण वेळापत्रक बदलणे गरजेचेही असते. मुंबईतील गर्दीच्या स्टेशनांमधून ‘जादा गाडी सोडा’ अशी मागणी प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधी आदींकडून केली जाते. या मागणीची दखल घेऊन मध्य व पश्चिम रेल्वे या जादा सेवा सोडण्यासाठी बदल करतात. पण, केवळ प्रवाशांनी मागणी केली म्हणून वेळापत्रकात बदल शक्य होत नाहीत. त्याकरिता रेल्वेला अनेक लहानसहान बाबी लक्षात घ्याव्या लागतात.
वेळापत्रकात नव्याने दाखल होणारी सेवा किंवा लांब पल्ल्याची गाडी कुठे टाकायची, यासाठी प्रवाशांकडून होणारी मागणी आणि त्या त्या स्थानकांवरील तिकीट विक्री यांचा विचार केला जातो. उदाहरणार्थ दिवा स्थानकातून जलद गाडय़ा सोडण्यास रेल्वेने मान्यता देण्याआधी तेथे प्रवाशांचे मोठे आंदोलन झाले होते. त्याचप्रमाणे या स्थानकातील तिकीट विक्रीतही लक्षणीय वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या स्थानकात जलद गाडय़ांसाठीचा प्लॅटफॉर्म बांधण्याची तयारी करून त्या गाडय़ांना थांबा देण्याचा निर्णय घेतला.
गरज अधोरेखित झाली की, किती सेवा आणि नेमक्या कोणत्या वेळी हव्या आहेत, याकडे लक्ष दिले जाते. त्या वेळेत त्या ठरावीक स्थानकांदरम्यान नवीन सेवा चालू करण्यास जागा नसेल, तर रेल्वेला वेळापत्रकात मोठय़ा प्रमाणात बदल करावा लागतो. अन्यथा कधी कधी त्या ठरावीक वेळेच्या दोन तास पुढे-मागे असलेल्या गाडय़ांच्या वेळेत आणि गन्तव्यस्थानात बदल करूनही नवीन सेवा सुरू करता येते.
लांब पल्ल्याची नवीन गाडी सुरू करताना केवळ याच गोष्टींकडे लक्ष देऊन चालत नाही. त्यासाठी टर्मिनल स्थानकातील मर्यादाही लक्षात घ्याव्या लागतात. म्हणजेच त्या वेळेत त्या गाडीसाठी टर्मिनल स्थानकात प्लॅटफॉर्म, गाडीचे डबे, इंजिन आणि ते चालवण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध आहे का, या गोष्टींचा विचार व्हावा लागतो. या चार गोष्टींबरोबर लांब पल्ल्याची गाडी ज्या ज्या विभागांमधून जाणार आहे, त्या विभागांमध्ये त्या गाडीसाठी मार्ग मोकळा असणे गरजेचे असते.
मुंबईसारख्या किंवा मध्य रेल्वेसारख्या जटिल प्रणालीत एक उपनगरीय किंवा लांब पल्ल्याची गाडी सुरू करताना इतर उपनगरीय वा लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वेळ, मालगाडय़ांची वेळ, रेल्वेरूळ देखभाल दुरुस्तीची वेळ आदी गोष्टींची दखल घ्यावी लागते. एका अर्थी वेळापत्रकात नवीन सेवा सहभागी करणे ही वेळ आणि अंतर यांची लढाई असते. अनेकदा या लढाईत दोन्ही गोष्टींचे समाधान होते, पण तरीही नवीन सेवा किंवा गाडी सहभागी करणे शक्य होत नाही. सध्या मध्य किंवा पश्चिम रेल्वे काही ठरावीक गाडय़ांच्या मदतीने त्यांच्या उपनगरीय सेवा चालवत आहेत. एक गाडी साधारण आठ सेवा दर दिवशी चालवते. या सेवांमध्ये वाढ करायची असल्यास मग नवीन गाडी आणणे गरजेचे असते. ही नवीन गाडी आणली, तरी त्या गाडीची देखभाल-दुरुस्ती करण्याच्या जागेचाही प्रश्न उद्भवतो.
उपनगरीय गाडय़ांचे वेळापत्रक तयार करणे, ही क्लिष्ट गोष्ट आहे. अनेकदा त्या-त्या वेळेला सुटणाऱ्या ठरावीक गाडय़ांमध्ये प्रवाशांच्या भावना गुंतलेल्या असतात. या भावना बाजूला ठेवल्या, तरी याआधी बोरिवली किंवा ठाणे येथून सुटणारी गाडी अचानक विरार किंवा कल्याण येथून सोडली, तर मूळ स्टेशनमधील प्रवाशांचा रोषही सहन करावा लागतो. त्यामुळे शक्य तो जुन्या वेळापत्रकात कमीत कमी बदल करून नवीन वेळापत्रक लागू करण्याकडे रेल्वे अधिकाऱ्यांचा कल असतो असे, पश्चिम रेल्वेच्या परिचालन विभागातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
वेळापत्रकात बदल करण्यासाठी गाडय़ांचा वेग वाढवून त्यांचा प्रवास वेळ कमी करणे, हादेखील एक मार्ग आहे. कल्याण ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस हे अंतर पार करण्यासाठी आधी गाडीला एक तास २० मिनिटे लागत असतील, तर गाडीचा वेग वाढवून हेच अंतर एक तास १० मिनिटांत पूर्ण करता येईल का, याकडे लक्ष दिले जाते. तसे झाल्यास आहे त्याच मार्गावर, आहे त्याच यंत्रणेत दहा मिनिटांचा कालावधी मिळतो. अशा प्रत्येक गाडीमागे पाच ते दहा मिनिटांचा कालावधी वाचल्यास त्या मार्गावर आणखी दोन ते तीन सेवा आरामात सुरू केल्या जाऊ शकतात. दोन वर्षांपूर्वी मध्य रेल्वेवर लागू झालेल्या वेळापत्रकात मुख्य मार्गावरील उपनगरीय सेवांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. त्या वेळी गाडय़ांचा वेग वाढवूनच ही किमया साधण्यात आली होती.
मुंबईतील उपनगरीय मार्गावर म्हणजे पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या चारही मार्गावर दिवसभरात जवळपास २९५०हून अधिक सेवा चालवल्या जातात. यात पश्चिम रेल्वेवर गर्दीच्या वेळेत दर तीन मिनिटांना एक गाडी सुटते. अशा १३०० सेवा दर दिवशी पश्चिम रेल्वेवर धावतात. मध्य रेल्वे, हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्ग यांवर मिळून १६६० सेवा चालवल्या जात आहेत. कोणतीही प्रणाली परिणामकारकपणे चालण्यासाठी त्या प्रणालीच्या ७० टक्के सेवाच चालू ठेवणे गरजेचे असते. मध्य रेल्वेची क्षमता १२०० सेवांची असताना प्रत्यक्षात मात्र १६६० सेवा चालवल्या जात आहेत. त्यामुळे आता या दोन्ही मार्गावर काही काळापर्यंत तरी नवीन सेवा चालू होण्याची शक्यता नाही. पुढील वर्षी दिवा-ठाणे यांदरम्यानची पाचवी-सहावी मार्गिका, अंधेरी-गोरेगाव हार्बर मार्ग विस्तारीकरण आदी प्रकल्प पूर्ण होणार आहेत. ते झाल्यानंतर पुन्हा एकदा वेळापत्रकाची आखणी सुरू होईल आणि ‘वेळ व अंतराची लढाई’ पुन्हा रंगेल.
रोहन टिल्लू
@rohantillu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2016 4:51 am

Web Title: important factors need to consider while making mumbai local train timetable
Next Stories
1 शिक्षणजगत : शारदा रात्रशाळेचे यश
2 रेडिओलॉजिस्टच्या संपामुळे रुग्णांची ससेहोलपट
3 मध्य रेल्वेचा अमंगळवार!
Just Now!
X