News Flash

विकासक सुधाकर शेट्टी यांच्या घर, कार्यालयावर छापे

शेट्टी यांच्या घरी तसेच सहाना ग्रुप ऑफ कंपनीच्या वरळीतील कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : कुख्यात तस्कर इक्बाल मिरची याच्या मालमत्तेची खरेदी करणाऱ्या ‘दिवाण हौसिंग फायनान्स’चे (डीएचएफएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांच्या अटकेनंतर सक्तवसुली महासंचालनालयाने (ईडी) याच प्रकरणात विकासक सुधाकर शेट्टी यांच्या घर तसेच कार्यालयावर छापे टाकले.

वाधवान यांच्या हजारो कोटी रुपयांच्या बेनामी व्यवहारातील काही बनावट आर्थिक नोंदीबाबत सुधाकर शेट्टी यांच्या कंपनीचा संबंध असल्याचे आढळल्याने हे छापे टाकण्यात आल्याचे सक्तवसुली महासंचालनालयाने स्पष्ट केले. शेट्टी यांच्या घरी तसेच सहाना ग्रुप ऑफ कंपनीच्या वरळीतील कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत. याबाबत अधिक तपशील देण्यास नकार देण्यात आला.

महासंचालनालयाकडून सध्या वाधवान यांची चौकशी सुरू आहे. वाधवान यांना वैद्यकीय तपासणीसाठी गुरुवारी जे. जे. इस्पितळात नेण्यात आले होते. ‘डीएचएफएल’च्या कर्जविषयक पुस्तकात एक लाख कोटी रकमेचा उल्लेख आहे. त्यापैकी २० हजार कोटी रुपयांचा स्रोत कळत नसल्याचे लेखा अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय १२ हजार ७७३ कोटी रुपयांचाही हिशोब लागत नसून, त्यापैकी काही  रक्कम इक्बाल मिरचीच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा सक्तवसुली महासंचालनालयाला संशय आहे. पाच बनावट कंपन्यांनाही तब्बल दोन हजार १८६ कोटी रुपये वळते करण्यात आले होते. या पाचही कंपन्यांवर कपिल व त्यांचे बंधू धीरज वाधवान हे संचालक आहेत. यातूनच काही संशयास्पद बाबी हाती लागल्याने त्याची अधिक चौकशी करण्यासाठीच शेट्टी यांच्या घर तसेच कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत, असेही या सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 3:35 am

Web Title: iqbal mirchi case ed raid developer sudhakar shetty house and office at mumbai zws 70
Next Stories
1 ‘लोकसत्ता वर्षवेध’ वाचकांच्या भेटीला 
2 प्रज्ञावंत तरुणाईच्या शोधाला आरंभ
3 मुस्लीम आरक्षणावर मंत्र्यांचा खल!
Just Now!
X