आयआयटीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज संकेतस्थळात मंगळवारी बिघाड झाल्याने लाखो विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. त्यामुळे आयआयटीला प्रवेश प्रक्रियेची वेळ रात्री दहापर्यंत वाढवावी लागली. आयआयटी प्रवेशाकरिता अभ्यासक्रमांचे पसंतीक्रम भरण्याची मंगळवारी शेवटची मुदत होती. २० जूनपासून ही प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु, बहुतांश विद्यार्थी आपल्या अर्जावर शेवटच्या दिवशी शिक्कामोर्तब करतात. परंतु, सकाळपासूनच ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीचे संकेतस्थळ धिम्या गतीने सुरू होते. थोडय़ा वेळाने तर ते काम करणेच बंद झाले. त्यामुळे प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले. ज्यांना शक्य होते त्या विद्यार्थ्यांनी आयआयटीमध्ये धाव घेतली. मुंबईत एका विद्यार्थ्यांने मुंबईच्या आयआयटी कॅम्पसमध्ये धाव घेतली असता तिथे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीचा सव्‍‌र्हर डाऊन झाल्याचे सांगितले. सव्‍‌र्हर पूर्ववत झाल्यानंतर अर्ज भरा, असे त्यांना सांगितले. याची चौकशी केली जाईल, असे जेईई (अ‍ॅडव्हान्स)चे अध्यक्ष एम. के. पाणिग्रही यांनी सांगितले.