|| सुशांत मोरे

महिलांसाठी उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल पदाच्या ४,५१७ जागा राखीव; १ जूनपासून अर्ज दाखल करण्याची मुदत

देशभरात रेल्वे सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल पदांच्या ९,७१९ जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी १ जूनपासून अर्ज दाखल करायचे असून अंतिम तारीख ३० जून अशी आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षा पाहता त्यांच्या सुरक्षेसाठी मोठय़ा प्रमाणात महिला सुरक्षारक्षकांचीही भरती करण्यात येणार आहे. भरती केल्या जाणाऱ्या एकूण जागांपैकी ४,५१७ जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

रेल्वे प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी ही रेल्वे सुरक्षा दलावर असते. सध्याच्या घडीला १७ विभागीय रेल्वेत एकूण ६० हजारांहून अधिक रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आहेत. मात्र वाढत जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा, उपनगरी गाडय़ा आणि प्रवासी संख्या पाहता हे मनुष्यबळ कमीच आहे. त्याशिवाय दरवर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळेही मनुष्यबळ कमी होत असते. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलच्या आणखी ९,७१९ जागांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वाधिक पदे ही कॉन्स्टेबलसाठी आहेत. एकूण ८ हजार ६१९ कॉन्स्टेबलची पदे भरताना यामध्ये ४ हजार ४०३ पुरुष, तर ४ हजार २१६ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर उपनिरीक्षक पदाच्याही १,१२० जागा भरल्या जात असल्याचे सांगण्यात आले. उपनिरीक्षकामध्ये ८१९ पुरुष तर ३०१ महिलांसाठी पदे आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही पदांसाठी अर्ज आणि त्याचे शुल्क हे ऑनलाइन स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३० जून तर शुल्क स्वीकारण्याची अंतिम मुदत २ जुलै अशी आहे. रेल्वेच्या संकेतस्थळावरही याची माहिती देण्यात आली आहे.

  • कॉन्स्टेबल पदाची भरती करताना मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे आणि दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेसाठी ४४० पुरुष आणि ७१२ जागा महिलांसाठी भरल्या जातील.
  • तर उपनिरीक्षक पदासाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे आणि दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या वाटय़ाला पुरुषांच्या १४४ आणि महिलांसाठी ५६ जागा आल्या आहेत.
  • मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रेल्वे सुरक्षा दलाचे १,८०० पर्यंत मनुष्यबळ आहे. मध्य रेल्वेला २२० मनुष्यबळाची गरज आहे. तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात १,८४६
  • मनुष्यबळ असून आणखी १३० जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले.
  • सध्याच्या घडीला १७ विभागीय रेल्वेत एकूण ६० हजारांहून अधिक रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आहेत. मात्र वाढत जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा, उपनगरी गाडय़ा आणि प्रवासी संख्या पाहता हे मनुष्यबळ कमीच आहे