किल्ल्याला कुलूप लावून पर्यटकांना अटकाव, पुरातत्त्व खात्याच्या परवानगीशिवाय बांधकाम

गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील समुद्रकिनारी असलेल्या गोपाळगड या राज्य संरक्षित स्मारकाचे दुर्दैव अजूनही संपलेले नाही. १० वर्षांच्या प्रयत्नानंतर २०१६ हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला असला तरी जागेची मालकी खासगी असल्याने त्या मालकाने किल्ल्याला कुलूप लावून पर्यटकांना अटकाव केला आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करून पुरातत्त्व खात्याच्या परवानगीशिवाय बांधकामही केले आहे.

अंजनवेल येथील या इतिहासकालीन किल्ल्याच्या कागदोपत्री नोंदींमध्ये अनेक गोंधळ असल्यामुळे दुर्गप्रेमी संस्थांच्या रेटय़ातून येथील सर्व भूभागाची २००७ मध्ये मोजणी करण्यात आली होती. त्यानंतर किल्ल्याची जागा १९६० सालीच केवळ ३०० रुपयांना लिलावात विकल्याचे निष्पन्न झाले. १० वर्षांच्या संघर्षांनंतर शासनाने गोपाळगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाला. मात्र किल्ल्याची जागा ताब्यात न घेता मालकी ही खासगीच ठेवण्यात आली. त्याचाच फायदा उठवत या जागेच्या मालकांनी  बेकायदा बांधकाम केले. दोन महिन्यांत  किल्ल्याला भेट देणाऱ्या दुर्गप्रेमी व पर्यटकांनी किल्ल्याच्या दरवाजावरील लोखंडी फाटकास कुलूप असल्याने किल्ल्यात प्रवेश करता येत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.

‘पुरातत्त्व विभागाच्या नियमानुसार राज्य संरक्षित स्मारकाच्या जागेवर खासगी मालकी असली तरी तेथे कोणतेही बांधकाम करायचे असल्यास तशी परवानगी राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाकडून घेणे बंधनकारक असते. तसेच खासगी मालकी असली तरी सूर्योदय ते सूर्यास्त या काळात पर्यटकांना प्रवेशबंदी करता येत नाही. गोपाळगडाच्या आतील भागात केलेल्या बांधकामाबाबत संचालनालयाकडून विस्तृत अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. दंडात्मक कारवाईचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असल्यामुळे पुढील कार्यवाही त्यांनी करणे अपेक्षित आहे,’असे संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत अद्यापही खासगी मालकावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तहसीलदार कार्यालयाकडून किल्ल्याच्या जागेचे मालक युनुस मण्यार यांना दोन नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतर अनधिकृत बांधकाम तोडणे अथवा कुलूप लावणे यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

मुंबईतील गिरिमित्र प्रतिष्ठान या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बारा वर्षांपूर्वी माहिती अधिकाराचा वापर करून गोपाळगडाच्या कागदपत्रांचा घोटाळा उघडकीस आणला होता. ‘लोकसत्ता’ने हा विषय प्रकाशात आणल्यानंतर राज्य शासनाला जाग आली. नंतरच्या काळात दुर्गवीर प्रतिष्ठान व गुहागर येथील दुर्गप्रेमींनी हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक करण्यासाठी प्रयत्न केला. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दिवशी येथे तालुका प्रशासनातर्फे झेंडावंदन केले जाते. येत्या १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर या झेंडावंदनासाठी दुर्गप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून खासगी मालकाच्या अरेरावीबद्दल निषेध करणार आहेत.