प्रा. सुहास पळशीकर यांचे प्रतिपादन

मुंबई : टिळक, गोखले, रानडे, आंबेडकर यांच्यासारखे देशाला नेतृत्व देणाऱ्या महाराष्ट्रात त्यानंतरच्या कालखंडात प्रस्थापित राजकीय, सामाजिक चौकट बदलू शकणारे नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही, देशाच्या राजकारणात तर मराठी नेतृत्व चाचपडताना दिसते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांनी केले.

‘गाथा महाराष्ट्राची’  या वेब व्याख्यानमालेतील ‘मराठी नेतृत्व – किती वेगळे, किती सरधोपट?’ या विषयावर प्रा. पळशीकर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले.

देशाच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणाऱ्या आणीबाणी, मंडल आयोग, हिंदुत्व आणि राजकीय स्वातंत्र्य मर्यादित करणे या प्रशद्ब्रांवर मराठी नेतृत्वाने काय भूमिका घेतली, मराठी नेत्यांनी देशाला दिशा दिली का, हिंदुत्वाला पर्याय म्हणून भारतीयत्वाची शक्ती वाढवली का, हे प्रश्न उपस्थित करून, मराठी नेतृत्वाच्या मर्यादा त्यांनी अधोरेखित केल्या.  लोकमान्य टिळकांनतर त्यांचे अनुयायी गांधी समजून घेऊ शकले नाहीत, त्यामुळे देशाच्या राजकारणात महाराष्ट्राचे नेतृत्व मागे पडले. १९२० ते १९५०, १९५० ते १९८० आणि त्यानंतरच्या काळातील राजकीय घडमोडींचा आढावा घेतला असता, त्या त्या कालखंडातील राजकारणावर काही नेत्यांचा ठसा उमटल्याचे दिसते. १९२० ते १९५० या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झंजावाती नेतृत्वापुढे इतर नेते झाकोळले गेले. १९५० ते १९८० या टप्प्यावर महाराष्ट्राच्या राजकारणावर यशवंतराव चव्हाण यांची छाप दिसते.  १९८० नंतर शरद पवार यांचा प्रभाव दिसतो, परंतु बाळासाहेब ठाकरे गोपीनाथ मुंडे यांचे अस्तित्व ते पुसून टाकू शकले नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला महाराष्ट्राचा दरवाजा खुला करु दिला. याच कालखंडात देशाला दखल घ्यावी लागली असे शरद जोशी यांचे नेतृत्व उदयाला आले, त्यांच्या राजकारणाचा धर्म हा आधार नव्हता, परंतु त्यांना मर्यादित यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. दादासाहेब गायकवाड,  प्रा. एन.डी. पाटील यांचाही राजकारणावर प्रभाव राहिला.

महाराष्ट्रात १९८० नंतरच्या राजकारणावर कमी अधिक प्रमाणात आपला प्रभाव टाकणाऱ्या राजकीय नेतृत्वांचा आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचा प्रा. पळशीकर यांनी धावता आढावा घेतला. प्रमोद महाजन यांच्या आधारामुळे मुंडे यांचे नेतृत्व पुढे आले आणि ओबीसी राजकारण करु पाहणाऱ्या छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाला लगाम बसला. महाराष्ट्राच्या राजकारणात ग्रामीण-शहरी नेतृत्व असा भेद कायम राहिला. शहरी-ग्रामीण प्रश्न समजून घेणारे विलासराव देशमुख यांचे नेतृत्व होते. महाराष्ट्राच्या राजकारणाशी मराठी जातीचे एक घट्ट संबंध तयार झाले. महाराष्ट्राच्या नेतृत्वार जात, प्रांत या घटकांची सावली राहिली, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. भाषणकौशल्य हे ठाकरे यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते. पवार मोठे वक्ते  नाहीत, परंतु जनसंवादाचे सामर्थ्य त्यांनी जपले, त्यातून त्यांचे नेतृत्व पुढे आले. राजकीय सत्ता, धोरणाच्या आधाराने जनहित कसे साधायचे याची पायाभरणी यशवंतराव चव्हाण यांनी के ली. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार हे दिल्लीच्या राजकारणात वावरले, मंत्रिपदे भूषविली, परंतु त्यांना सर्वोच्च नेतृत्वाने हुलकाणी दिली, याकडे पळशीकर यांनी लक्ष वेधले.

गोदुताई परुळेकर, अहिल्याई रांगणेकर, मृणाल गोरे, शालिनीताई पाटील यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर छाप राहिली. मेधा पाटकर यांनी जनआंदोलनातून समोर आणलेल्या मुद्यांची देशपातळीवर दखल घ्यावी लागली. या काही महिला नेत्यांचा अपवाद वगळला तर, महाराष्ट्रात नेतृत्वाची चौकट कायम पुरुष प्रधान राहिली, असे त्यांनी सांगितले.

वाचकांच्या प्रश्नांना उत्तर देताना, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाला फसवता फसवता नेते स्वत:च जाळ्यात अडकले, असे निदर्शनास आणून आता खरी कसोटी नेत्यांची आहे, असे ते म्हणाले. गेल्या दहा वर्षात मराठा समाजाचे ग्रामीण व शेतीचे प्रशद्ब्रा निर्माण झाले आहेत, ते तातडीने सोडवावे लागतील, अन्यथा महाराष्ट्र ज्वालामुखीच्या तोंडावर असेल, त्याचे सर्वांनाच चटके  बसतील, असा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्राच्या तर्कवादावर सोमवारी व्याख्यान…

महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला असलेला तर्कवादाचा आधार हे या प्रदेशाचे वेगळेपण नेहमीच दाखवून देत आले आहे. याच संदर्भात ‘गाथा महाराष्ट्राची’ या वेब व्याख्यानमालेत येत्या सोमवारी दि. १० मे रोजी सायंकाळी सहा वाजता,  ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे ‘महाराष्ट्राचा तर्कवाद’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. उपस्थितीसाठी http://tiny.cc/LS_ Maharashtra _Gaatha  येथे नोंदणी आवश्यक.

महाराष्ट्राच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये जशी आहेत, तसेच येथील जनतेचेही वेगळेपण आहे. महाराष्ट्राची जनता फार काळ एकाच नेत्याच्या मागे रहात नाही. नेत्यांना डोक्यावर बसविण्याबाबत कंजूषपणा जनतेने दाखविला, याचा आनंद आहे.  – सुहास पळशीकर

प्रस्तुती : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. आणि मे. बी. जी. चितळे डेअरी

पॉवर्ड बाय : मांडके हिर्अंरग सर्व्हिसेस, पुणे</strong>