उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या कुणी ठेवल्या? या प्रश्नाचं उत्तर अजून सापडलेलं नसतानाच स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणी आता एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावरून आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सुनावले आहे. “राज्य सरकारला लाज वाटली पाहिजे. मनसुख हिरेन यांचा जीव जाऊ शकतो हे मी आधीपासून सांगत होतो. ते सगळयात महत्त्वाचे साक्षीदार होते. दुर्दैवाने त्यांचा जीव गेला. आता एटीएसने त्यांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मी सांगत होतो, तेच एटीएसच्या तपासात पुढे यायला लागलं आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

गृहमंत्र्यांनी दिली सभागृहात माहिती

मनसुख हिरेन प्रकरणाला आता नवं वळण मिळालं असून त्यांची हत्या झाल्याचा गुन्हा एटीएसने दाखल केला आहे. याआधी मुंबई पोलीस गुप्त वार्ता विभागाचे अधिकारी सचिन वाझे यांच्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही आक्षेप घेतले होते. त्यासोबतच, अँटिलियाच्या बाहेर स्कॉर्पिओ कार थांबल्यानंतर त्यापाठोपाठ अजून एक कार देखील तिथे येऊ थांबली होती, हे देखील निर्शनास आणून दिलं होतं. त्यावरून राज्य सरकारवर विधिमंडळ अधिवेशनात मोठी टीका झाल्यानंतर राज्य सरकारकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास करणाऱ्या एटीएसने या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तपास सुरू आहे, अशी माहिती सभागृहाला दिली.

सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला खोचक टोमणा

दरम्यान, या प्रकरणावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर परखड शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे. “माझे वडील चांगले पोहणारे होते आणि आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांना कोणताही ताण नव्हता. फोन आला आणि ते बाहेर पडले ते पुन्हा परतलेच नाहीत, अशी माहिती मनसुखच्या मुलाने दिली. पण त्यांच्याकडील प्रत्येक माहिती खरी असेलच असे नाही. मृत्यू कुणाला चुकला आहे? त्यात अनैसर्गिक मृत्यू आप्तेष्टांना हलवून जातो. मनात संशय निर्माण करतात आणि राजकारणी त्यात भर घालतात. मनसुख मृत्यू प्रकरणी तपास सुरू असताना विरोधी पक्ष तेच करीत आहेत. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही सवय विरोधी पक्ष लवकरात लवकर मोडेल तेवढे बरे!”, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

दाऊद, शिवसेना ते अँटिलिया! नक्की कोण आहेत सचिन वाझे?