व्यायामशाळेच्या बांधकामासाठी इमारतीच्या संरचनेत बदल

घाटकोपरमधील सिद्धीसाई इमारत दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर माहीम येथील ओम-शिवम गृहनिर्माण संस्थेतील अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज व्यायामशाळेच्या बांधकामासाठी इमारतीच्या मूळ ढाच्यात बदल केल्याने येथील रहिवासी भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. व्यायामशाळेकरिता या निवासी इमारतीच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावर केले गेलेले बदल बेकायदा असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यांनी याची तक्रार महापालिकेकडेही केली आहे. मात्र, वारंवार तक्रार करूनही गेले वर्षभर काहीच कारवाई झालेली नसून पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.

माहीम पश्चिम येथील एल. जे. मार्गावर असलेल्या ओम-शिवम गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचे बांधकाम फक्त १५ वर्षे जुने आहे. २००३ साली बांधलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर ‘क्लाउड नाईन’ ही व्यायामशाळा आहे. २००४ला इमारतीच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील चार निवासी सदनिकांची एकाच कुटुंबामार्फत खरेदी झाली होती. त्यानंतर या चारही सदनिका पाडून त्या जागी ‘क्लाउड नाईन’ व्यायामशाळा बांधण्यात आली. व्यायामशाळेकरिता इमारतीच्या मूळ रचनेत फेरफार केल्याचे रहिवासी सांगत आहेत.व्यायामशाळेकरिता दोन्हीं मजल्यावरील सदनिकांच्या दर्शनी बाजूची भिंत पाडून त्याजागी काचेची भिंत उभी करण्यात आली. तसेच स्लॅब आणि खांबांचे पाडकाम करून दोन्ही मजले पोटमाळ्याने जोडण्यात आले आहेत. हे फेरफार बेकायदा असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. याशिवाय इमारतीसमोरील सोसायटीची चार फूट जागाही व्यायामशाळेने ताब्यात घेतली आहे.

सोसायटीच्या कार्यालयासाठी राखीव असलेली २०० चौरस फूट जागाही व्यायामशाळा मालकाने गिळंकृत केल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.याबाबत मागील दहा वर्षे सोसायटीचे रहिवासी पालिकेकडे दाद मागत आहेत. या विषयी पालिकेच्या जी-उत्तर विभागाचे साहाय्यक-आयुक्त रमाकांत बिरादर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात माहिती नसल्याचे सांगितले, तसेच रहिवाशांची तक्रार असल्यास या प्रकरणात लक्ष घालू, असे उत्तर त्यांनी दिले. या प्रकरणाबाबत व्यायामशाळाचे मालक हरजित सिंह गांधी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

ना हरकत प्रमाणपत्र नाहीच

व्यायामशाळेचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी पालिकेच्या जी-उत्तर विभागाला दिले होते. मात्र आदेशाला वर्ष लोटून गेले तरी पालिका या संदर्भात कोणतीही कारवाई करत नसल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद घरत यांनी दिली. अंतर्गत रचना बदलताना व्यायामशाळा मालकाने सोसायटीचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते. सोसायटीने ना हरकत दिल्यानंतर पालिका बांधकामाला परवानगी देते. मात्र सोसायटीने ते दिले नसतानाही पालिकेकडून व्यायामशाळेतील बांधकामाला परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्नही घरत यांनी उपस्थित केला आहे.