‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे आग्रही मत

बेळगावात मराठी साहित्य-संस्कृतीचा वारसा वाचनालयाच्या माध्यमातून जतन करणारी मंडळी ते पूवरेत्तर राज्यात जाऊन तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे रत्नागिरीतील भय्याजी काणे यांच्यासारख्या व्यक्ती याच खऱ्या ‘हिरो’ आहेत. आपल्या सकारात्मक विचारांच्या माध्यमातून समाजात बदल घडवणाऱ्या अशा खऱ्या व्यक्तींची ओळख करून देण्याचे काम माध्यमांनी करायला हवे. माध्यमांनी समाजातील सकारात्मक बाजू उचलून धरली तर लोकही निर्थक आणि नकारात्मक गोष्टींत वेळ घालवणार नाहीत, असे आग्रही प्रतिपादन ‘नाम’सारख्या संस्थेच्या माध्यमातून दुष्काळापासून लोकांच्या नानाविध समस्यांवर मार्ग शोधत समाजकार्याची एक साखळी निर्माण करणारे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.

समाजात विविध स्तरांवर सुरू असलेल्या सेवाकार्याला ‘अर्थ’ मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’रूपी दानयज्ञाला लोकांच्या विश्वासार्हतेचे अधिष्ठान मिळाले असल्याचे या उपक्रमाच्या सहाव्या पर्वाच्या सांगता सोहळ्यादरम्यान पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या उपक्रमात यंदा सहभागी झालेल्या दहा संस्थांना सोमवारी मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आले. कुठल्याही गोष्टीची आरंभशूरता आपण नेहमी पाहतो, मात्र समाजात बदल घडवून आणण्यासाठी झगडणाऱ्या आणि त्यांना मदत करू पाहणाऱ्यांना एकाच व्यासपीठावर जोडून घेणारा ‘सर्वकार्येषु सर्वदा’सारखा उपक्रम सातत्याने इतका काळ टिकून ठेवणे, उत्तरोत्तर त्याची प्रसिद्धी वाढवत नेणे हे महत्त्वाचे काम आहे. समाजातील खऱ्या हिरोंना लोकांसमोर आणण्याचे काम ‘लोकसत्ता’ने एक माध्यम म्हणून नेटाने सुरू ठेवल्याबद्दल मकरंद अनासपुरे यांनी कौतुक केले. एरवी वर्तमानपत्रांत कलाकारांची छायाचित्रे, चित्रपटातील मुख्य कलाकारांच्या फुटकळ बातम्या किंवा फुटकळ लोकांच्या प्रतिक्रियांना मोठे माप दिले जाते. त्याऐवजी सातत्याने समाजातील सकारात्मक बाजूची मांडणी झाल्यास एक चांगले दळणवळण निर्माण होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘सर्वकायेषु सर्वदा’ उपक्रमाचे उद्दिष्ट, त्यामागील भूमिका विशद केली.

(कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत.. रविवारच्या अंकात)