करोना संसर्गाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणाची भूमिका टप्प्याटप्प्याने मांडत आहेत. पण सत्ता गेल्यापासून अस्वस्थ झालेले आमदार चंद्रकांत पाटील हे त्यांना मोर्चे काढण्यास प्रवृत्त करत आहेत. संयत भूमिका मांडणाऱ्या संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी होईल, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी व्यक्त केले.

मराठा आरक्षण प्रश्नावर संभाजी राजे छत्रपती यांनी आंदोलनाची भूमिका विशद केली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नासाठी आंदोलन करण्याची गरज व्यक्त करतानाच संभाजीराजे हे राज्यातील आघाडी सरकारला मदत करीत आहेत का, अशी विचारणा केली होती. त्यामुळे हा प्रश्न चर्चेत आला होता. दरम्यान, पूर्वी राष्ट्रवादीत असलेले संभाजीराजे यांच्या भूमिकेचे राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथे पत्रकार परिषदेत समर्थन केले आहे.

हेही वाचा – ..तर पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल, आम्ही स्वतंत्रच लढणार – नाना पटोले

हसन मुश्रीफ म्हणाले, “मराठा आरक्षण प्रश्नी संभाजीराजे संयमाने पुढे जाण्याच्या भूमिकेत आहेत. चंद्रकांत पाटील हे त्यांना आंदोलन केले पाहिजे, असे म्हणून उचकवत आहेत. सध्या करोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. याची संभाजीराजे यांना जाणीव असून आताच्या काळात त्यांची भूमिका रास्त आहे.”

“उपमुख्यमंत्र्यांची सोमवारी चर्चा महाविकास आघाडीचे सरकार मराठा आरक्षण निश्चितपणे मिळवून देईल. त्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्त्याला दिलेली जबाबदारी निश्चितपणे पार पाडेल. उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी कोल्हापूर दौरा करणार आहेत. करोना आढावा बैठक झाल्यानंतर ते मराठा आरक्षण प्रश्नी समाजाच्या प्रतिनिधीशी चर्चा करणार आहेत”, असे मुश्रीफ यांनी नमूद केले.