30 September 2020

News Flash

‘मराठी रीडर’ अ‍ॅपला वाचकांकडून वाढता प्रतिसाद

मराठी रीडरवरील एका वाचकाने गेल्या तीन आठवडय़ांत १२ ते १४ पुस्तके डाऊनलोड केली

डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या ९० व्या मराठी साहित्य संमेलनात पुस्तकांची विक्री कमी झाल्याची साहित्यिकांकडून ओरड केली जात असताना याच संमेलनात प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मराठी रीडर’ या अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप्लिकेशनला गेल्या २२ दिवसांत सुमारे १५०० हून अधिक वाचकांनी पसंती दर्शविली आहे.

मराठीतील मौज, राजहंस, ज्योत्स्ना, पॉप्युलर, रोहन, कॉन्टिनेन्टल या पाच प्रकाशकांनी सुरू केलेले ‘मराठी रीडर’ हे ‘स्मार्ट’ पाऊल वाचकांसाठी सोयीचे ठरले असून वाचकांकडून अधिकाधिक पुस्तकांची मागणी आयोजकांकडे केली जात आहे. तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांना बदलत्या काळानुसार नवनवे पर्याय उपलब्ध करण्याची गरज लक्षात घेऊन मराठीतील नामांकित प्रकाशकांनी ‘मराठी रीडर’ हे अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन सुरू केले.

गेल्या आठवडय़ात अच्युत गोडबोले यांचे व्यवस्थापनावरील ‘बोर्डरूम’ आणि संगीतविषयक ‘नादवेध’ ही पुस्तके मराठी रीडरवर उपलब्ध करण्यात आली असून याला वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठी रीडरवरील एका वाचकाने गेल्या तीन आठवडय़ांत १२ ते १४ पुस्तके डाऊनलोड केली आहेत, असे रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर यांनी सांगितले. पुढील महिन्यात ‘मौज प्रकाशन’ची काही पुस्तकेही वाचकांना अ‍ॅपवर वाचण्याची संधी मिळणार आहे. सध्या या अ‍ॅपवर दीडशे पुस्तके उपलब्ध असून यात बालसाहित्य, कथा-कादंबरी, माहितीपर, चरित्रपर व अनुवादित पुस्तके उपलब्ध आहेत.

डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनात ‘मराठी रीडर’ या अ‍ॅप्लिकेशनचे प्रकाशन केल्यानंतर अनेक छोटे-मोठे प्रकाशक आणि प्रामुख्याने लेखकांनीही या उपक्रमात सामील होण्यासाठी उत्साह दाखविला आहे, असेही चंपानेरकर यांनी सांगितले.

  • आतापर्यंत मराठी रीडर हे अ‍ॅप १५०० वाचकांनी डाऊनलोड केले असून गेल्या तीन आठवडय़ांत या माध्यमातून १५० हून अधिक पुस्तकांची विक्री झाली आहे. या अ‍ॅप्लिकेशनवरील वाचक हा प्रामुख्याने २५ ते ४० या वयोगटातील आहे.
  • मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठी रीडरवरील ५० टक्के सवलत पुढील महिन्यापर्यंत वाढविण्यात आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2017 2:19 am

Web Title: marathi reader app
Next Stories
1 मनसेमुळे शिवसेनेचे १४ उमेदवार नापास
2 ‘व्हिण्टेज कार फिएस्टा’ कार्यक्रमात दुर्मीळ वाहनांचा सहभाग
3 सात वर्षांत २५ हजार झाडांवर कुऱ्हाड
Just Now!
X