03 March 2021

News Flash

झेंडूचे भाव कडाडले 

आवक ७० टक्कय़ांनी कमी; दर ३०० रुपये किलो

आवक ७० टक्कय़ांनी कमी; दर ३०० रुपये किलो

मुंबई : गेल्या वर्षी १२० रुपये किलोपर्यंत स्थिरावलेला झेंडूचा दर यंदा दुपटीपेक्षा वाढून  ३०० रुपये किलो इतका झाला. बाजारात सध्या मागणी मर्यादीत असली तरी टाळेबंदीच्या काळात उद्ध्वस्त झालेल्या झेंडूच्या बागा आणि ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर महापुराच्या फटक्यामुळे मुंबई बाजारात येणाऱ्या झेंडूची आवकच ७० टक्कय़ांनी घटली आहे.

मुंबई आणि महानगर परिसरात झेंडूची आवक  प्रामुख्याने सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ातून, तसेच सासवड-पुरंदर आणि जुन्नर परिसरातून होते. त्यासाठीची लागवड प्रामुख्याने जून-जुलैच्या दरम्यान केली जाते. टाळेबंदीच्या काळात आणि शिथिलिकरणाच्या धरसोड भूमिकेने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा फुलांची लागवड केली नाही. त्यात सांगली-कोल्हापूर जिल्ह्य़ातील नदीकाठच्या गावांमध्ये केलेल्या लागवडीला महापूराचा फटका बसला. ‘दरवर्षी सांगली-कोल्हापूर जिल्ह्य़ातून सुमारे २० टन झेंडूची दिवसाला वाहतूक होते, मात्र सध्या केवळ सहा टनच झेंडूची वाहतूक होत असल्याचे,’ कोल्हापूर जिल्ह्य़ातील व्यावसायिक भरत मरजे यांनी सांगितले.

दुसरीकडे जुन्नर परिसरात पावसामुळे फुलांची गुणवत्ता घसरली असल्याचे शेतकरी विश्वास धोंडकर यांनी सांगितले. परिणामी दर कमी मिळत असल्याचे ते म्हणाले. गणेशोत्सवाच्या काळात अनेक मोठी मंडळे चार-पाच दिवस आधी झेंडू घेऊन ठेवतात. तसेच काही ग्राहकदेखील वैयक्तिक स्तरावर मोठय़ा प्रमाणात खरेदी करतात. यंदा मंडळांकडून फार प्रतिसाद नाही. तर काही ठिकाणाहून येणाऱ्या झेंडची गुणवत्ता नसल्याने फुल फार काळ टिकत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

सध्या ग्राहकांचे प्रमाण मर्यादीत असले तरी शुक्रवारी मागणी वाढू शकते, तसेच याचवेळी राज्यातील इतर ठिकाणचा तसेच कर्नाटकातील काही झेंडू बाजारात उतरला तर दर कमी होऊ शकतात. मात्र तोपर्यंत झेंडूचे दर चढेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुरवठाच खुंटला..

सर्वसाधारणपणे गणेशोत्सवाच्या आधी बाजारात झेंडूची आवक वाढू लागते. पण त्याचवेळी मागणीदेखील वाढत असल्याने दर चढे राहतात. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी राज्यातील विविध भागांतून झेंडू मुंबईच्या बाजारात येऊ लागला की दरात चढउतार होऊ लागते. मात्र यंदा करोनामुळे गणेशोत्सवावर मंदीचे सावट असले तरी पुरवठाच खुंटल्याने भाववाढ होत आहे.

पूजेची इतर फुलेही महाग

पावसामुळे मोगऱ्याची आवक घटली आहे.  पूजेसाठी लागणारी चमेली, जास्वंद ही फुले, तसेच दुर्वा  वसई, विरार परिसरातील शेतकरी लोकल रेल्वे गाडय़ांतून घेऊन येतात. जास्वंदीच्या किंमतीत फारसा फरक पडलेला नाही मात्र अन्य फुलांची आवक लोकल सेवा बंद असल्याने कमी झाली आहे. त्याचा परिणाम किंमतीवर झाला आहे.

मोगऱ्याला सर्वाधिक दर?

मोगऱ्याची आवक अतिशय कमी असून हीच स्थिती राहिल्यास शुक्रवापर्यंत किलोला दोन हजार रुपयांपर्यंत दर जाण्याची शक्यता असल्याचे,’ स्वर्गीय मिनाताई ठाकरे फुल बाजार व्यापारी मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र हिंगणे यांनी सांगितले. गेल्यावर्षी दुर्वांची जुडी २० ते ३० रुपयांना विकली जात होती. रेल्वे बंद असल्याने बहुतांश आदिवासींना दुर्वा विक्रीस आणणे शक्य झाले नाही. खासगी वाहनाने दुर्वा आणणे परवडणारे नाही. त्यामुळे दुर्वाचे दर जुडीसाठी ५० रुपयांपर्यंत पोहचल्याचे, विक्रेते नवनाथ भगत यांनी सांगितले.

मुंबईतील किरकोळ बाजारातील दर

झेंडू – ३०० रुपये किलो

जास्वंद २० रुपयांना बारा फुले

पांढरी शेवंती – १६० रुपये किलो. दुपारनंतर २०० रुपये झाले

लाल किंवा जांभळी शेवंती – ३२० रुपये किलो

डिस्को शेवंती – ४०० रुपये

गुलछडी / रजनीगंधा – ४०० किलो

गुलाब – ८० रुपये २० फुले

वानगाव मोगरा – ६०० रु. किलो

विरार मोगरा – १४०० रुपये. चांगल्या दर्जाचा मोगरा

चमेली – ८०० ते १००० रुपये किलो

जरभरा – ५० रुपये १० फुले

दुर्वा मोठी जुडी – ५० रुपये

चाफा – ३०० रुपये शेकडा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 1:41 am

Web Title: marigold flower rate in mumbai retail market is rs 300 per kg zws 70
Next Stories
1 ग्रंथनिवडीची संपूर्ण यंत्रणाच सदोष!
2 एसटी प्रवासाचा पहिला दिवस गोंधळाचा
3 येस बँक गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ला तडाखा
Just Now!
X