गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. एकूण परिस्थिती लक्षात घेता मुंबईत अंशत: टाळेबंदी करावी लागेल असे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिले.

मुंबईत जानेवारी महिन्यात करोना संसर्ग नियंत्रणात येऊ लागला होता. मात्र मुखपट्टीविना फिरणारे नागरिक, सामाजिक अंतराच्या नियमांना हरताळ अशा विविध कारणांमुळे फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गेले दोन दिवस नव्या करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने मुंबईत अंशत: टाळेबंदी करावी लागेल, असे किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले.

उच्चभ्रू वस्त्यांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी धार्मिक स्थळे, बाजारपेठा, उपनगरीय लोकल यांवर निर्बंध घालावे लागतील. याबाबत मुख्यमंत्री लवकरच योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.