पुरातत्त्व, भूरचनाशास्त्रावर १४ ते १७ डिसेंबरदरम्यान भव्य प्रदर्शन

पुरातत्त्वशास्त्र आणि भूरचनाशास्त्रावर भव्य प्रदर्शन मुंबई विद्यापीठाच्या वतीने १४ ते १७ डिसेंबर या काळात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात दुर्मीळ आणि मौल्यवान अशी खनिजे, जीवाश्म, शस्त्रास्त्रे, प्राचीन आणि मध्ययुगीन नाणी, मातीची भांडी, प्राचीन खेळ आणि प्राचीन आणि मध्ययुगीन कोरीव शिल्पे यांचा समावेश असेल. भारतीय वस्तूंसह दुर्मीळ परदेशी वस्तूही मांडल्या जाणार आहेत.

याशिवाय ब्राह्मी, मोडी, खरोष्ठी आणि बॅक्टेरीअन ग्रीक या पुरातन लिपी विद्यार्थी आणि नागरिकांना पाहायला मिळतील. या लिपींचे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतील पुस्तके दिली जाणार आहेत. रिंग प्रकारातील किल्ला, रोमन कॅस्टारम किल्ला, मराठा किल्ला आणि लाल किल्ला यांच्या प्रतिकृती बनवल्या जाणार आहेत. या किल्ल्यांमधून संस्कृतीचा उदय आणि विकास कसा झाला हे समजावून सांगितले जाणार आहे. तसेच त्यांच्या मानवी समाजजीवनावरील प्रभावाविषयीची माहिती दिली जाणार आहे.मुंबई विद्यापीठाचे ‘सेंटर फॉर एक्स्ट्रा-म्युरल स्टडिज्, द इन्स्टय़ुसेन ट्रस्ट, पुण्यातील डेक्कन महाविद्यालय, मक्की आणि विक्रम राव यांचे संकलन, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, इन्स्टिटय़ूट फॉर ओरियंटल स्टडिज ठाणे, एमएमआरसी आणि सीएचएईएन येथील साहित्य प्रदर्शनात मांडले जाणार आहे. भूशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्र हे भारतात तसे दुर्लक्षित विज्ञान आहे. आपल्याकडे भूशास्त्रीय आणि जीवाश्मामधील वैविध्य प्रचंड आहे. यांमध्ये संशोधनाच्या अनेक संधी आहेत. यासारख्या शाखांकडे विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सेंटर फॉर एक्स्ट्रा-म्युरल स्टडिजच्या मुग्धा कर्णिक यांनी यावेळी सांगितले.