आतापर्यंत प्रामुख्याने शेती व हवाई वाहतुकीपुरती मर्यादित असलेली हवामान खात्याची सेवा स्थानिक पातळीवर जनसामान्यांसाठी खुली करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरात सफर प्रकल्पांतर्गत ३० केंद्रे उभी करण्यात आली आहेत. उपनगरातील हवामानाचा आणि प्रदूषणाच्या घटकांची नोंद करून त्याची माहिती १३ ठिकाणी सार्वजनिक स्थळांवर इलेक्ट्रॉनिक माहिती फलकाद्वारे मिळेल. नवी दिल्ली व पुणे यानंतर मुंबईत सुरू झालेल्या या सेवेचे उद्घाटन मंगळवारी केले जाणार आहे.
पाऊस आणि तापमान या दोन्हीबाबत मुंबईकर कमालीचे जागरूक झाले आहेत. त्याचसोबत कार्बन, सल्फर, धूलिकण या प्रदूषणकारी घटकांबाबतही जागृती येत आहे. हवाई वाहतुकीसाठी सांताक्रूझ येथे व नौदल तसेच तेलविहिरींसाठी कुलाबा येथे उभारण्यात आलेल्या केंद्रांमधून मुंबईकरांना तापमान व पावसाची माहिती आतापर्यंत मिळत आहे. मात्र प्रत्येक उपनगरात तापमान व पावसासह हवामानातील विविध घटकांची नोंद घेण्यासाठी ३० केंद्रे उभारण्यात आली आहेत. यातील १० केंद्रे ही मुख्यत्वे हवामानातील प्रदूषण करणाऱ्या घटकांची नोंद करतील व त्यात हवामानाचे घटक मोजण्याचीही यंत्रणा असेल. उर्वरित २० ही स्वयंचलित हवामान केंद्र आहेतही केंद्रे उभारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सहकार्य केले आहे. भूविज्ञान मंत्रालय, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपकिल मेटेरोलॉजी, पुणे (आयआयटीएम) आणि मुंबई महापालिका यांनी एकत्रितरीत्या सुरू केलेल्या ‘सफर- मुंबई’ या प्रकल्पांतर्गत मोबाइलवर सफर एअर हे अॅपही सुरू केले आहे.
आंतरराष्ट्रीय निकषांनुसार ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही माहिती मुंबईकरांना १३ माहिती फलकांमधून मिळू शकेल. तसेच  हवामानाचे पूर्वानुमान काढणेही शक्य होणार आहे, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

या ठिकाणी झळकणार हवामानाची माहिती
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, हाजीअली चौक, दादर प्लाझा सिनेमा, एमआयटी चौक मालाड, मुलुंड चेक नाका,चेंबूर, कला नगर वांद्रे,जुहू, वाशी, देशांतर्गत विमानतळ, मंत्रालय, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरिवली)

‘मुंबई -सफर’ म्हणजे ?
मुंबईतील विविध ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. हवेतील धूलिकण, विषारी वायू, दृश्यमानता,  तापमान आणि पर्जन्यमानाच्या नोंदी ठेवल्या जाणार आहेत.
फायदा काय?
शहरातील विशिष्ट ठिकाणाची हवामानाची, प्रदूषणाची पातळी मोजण्याबरोबरच घडणारे सूक्ष्म बदल टिपणे. दोन तास आधी पूर्वानुमान काढता येईल.