16 February 2019

News Flash

आज ‘एमएचटी-सीईटी’

राज्यातील १०५६ परीक्षा केंद्रांवर एकूण ४,०९,२६० इतके विद्यार्थी ही परीक्षा देतील.

राज्यभरातून सुमारे चार लाख परीक्षार्थी

महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खासगी महाविद्यालयांमधील वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांचे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांचे प्रवेश निश्चित करणारी सामाईक प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘एमएचटी-सीईटी’ उद्या (गुरुवारी) होणार आहे. राज्यातील १०५६ परीक्षा केंद्रांवर एकूण ४,०९,२६० इतके विद्यार्थी ही परीक्षा देतील.

२०१६-१७ या शैक्षणिक वर्षांपासूनच केंद्रीय स्तरावरील ‘नीट’ या प्रवेश परीक्षेद्वारे एमबीबीएस-बीडीएस या महत्त्वाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश निश्चित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे एमएचटी-सीईटी द्यायची की नाही, अशा संभ्रमात वैद्यकीय प्रवेशोच्छुक विद्यार्थी होते. मात्र, किमान २०१६-१७ मध्ये तरी ‘नीट’ची सक्ती राज्यातील विद्यार्थ्यांना करण्यात येऊ नये, याकरिता राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढा देत आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी संपूर्ण तयारीनिशी ही परीक्षा द्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी केले. महाराष्ट्रासह विविध राज्यांनी, अल्पसंख्याक व खासगी संस्थांनी आणि विद्यार्थ्यांनीही निर्णयाचा फेरविचार करण्याकरिता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. या याचिकांवरही गुरुवारीच सुनावणी होणार आहे. त्यामुळे एकाच वेळी परीक्षेबरोबरच न्यायालयाच्या निकालाची धाकधूकही विद्यार्थ्यांच्या मनात आहे.महाराष्ट्रात ३६ जिल्ह्य़ांमध्ये तब्बल २९ हजार कर्मचारी गुरुवारी ‘एमएचटी-सीईटी’च्या कामात गुंतले आहेत. एकूण १०५६ शाळांमध्ये या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून सर्वाधिक परीक्षा केंद्र मुंबई शहर (६३) आणि उपनगरात (४३) आहेत. एकूण ४,०९,२६० परीक्षार्थीपैकी १,४१,०१४ विद्यार्थी वैद्यकीय व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) या विषयगटाची परीक्षा देतील, तर १,२५,९८१ इतके विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीच्या पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) विषयगटाची परीक्षा देणार आहेत. चारही विषय घेऊन परीक्षा देणारे १,४२,२६५ इतके विद्यार्थी आहेत.

भाषानिहाय विद्यार्थी

 • इंग्रजी – ४,०५,९४०
 • मराठी – १६७०
 • उर्दू – १६५०

मुंबई-पुणे-ठाण्यातून सर्वाधिक विद्यार्थी

 • मुंबई शहर – २५२४२
 • मुंबई उपनगर – २०९७९
 • ठाणे – २५३८४
 • पुणे – ४४३०३

परीक्षेची वेळ

 •  सकाळी ९.१५ला

परीक्षा केंद्रांवर प्रवेश

 • पेपर १ – सकाळी १० ते ११.३०
 • पेपर २ – दुपारी १२ ते १.३०
 • पेपर ३ – दुपारी ३ ते ४.३०

First Published on May 5, 2016 2:24 am

Web Title: mht cet exam
टॅग Mht Cet