प्रसेनजीत इंगळे

यावर्षी गणेशोत्सवाला करोना महामारीचे विघ्न आले आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा सण अगदी साधेपणाने साजरा होत आहे. या उत्सवाचे स्वरूपही या महामारीने पालटून टाकले आहे. कोकणात स्थापन होणारे गणपती या वर्षी वसई-विरारमध्ये स्थापित होताना दिसत आहेत. त्यामुळे या वर्षी कोकणातल्या बाप्पांचे एका अर्थाने वसईत स्थलांतर होत असल्याचे चित्र आहे.

गणपती उत्सवासाठी वसई-विरारमधील लाखो रहिवासी आपल्या मूळ गावी कोकणात १० ते १५ दिवसांसाठी जात असतात. या ठिकाणी ते पिढीजात चालत आलेल्या गणपतीची पारंपारिक पद्धतीने स्थापना करतात. पण यावर्षी करोना महामारीने सर्वच गणिते बदलली. सर्वप्रथम करोनाने अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आणली. त्यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळली. त्यानंतर कोकणात जाण्यासाठी प्रवासी परवानग्या मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे कोकणात गेल्यानंतर १४ दिवस अलगीकरणात राहून नंतरच गावात प्रवेश दिला जाणार होता. यामुळे अनेकांनी आपला गावी जाण्याचा बेत रद्द करून गावी स्थापन केल्या जाणाऱ्या गणेशमूर्त्या यंदा वसई-विरारमध्येच स्थापन करून अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करीत आहेत.

विरार पूर्वमधील नाना नानी पार्कमध्ये राहणारे प्रकाश पडावे हे दरवर्षी कोकणात आपल्या गावाच्या घरी गणेश मूर्तींची स्थापना करत असत पण यावर्षी करोनामुळे त्यांना गावी जाणे शक्य झाले नाही. त्याचबरोबर आता मुलांचे ऑनलाइन वर्ग सुरु झाले आहेत. त्यामुळे त्यांनी यावर्षी विरार येथील राहत्या घरीच दीड दिवसाच्या बप्प्पाची स्थापना केली आहे. अशाच प्रकारे कारगिल नगरमधील सुधीर मांडवकर यांनी सुद्धा आपल्या गावाच्या गणपतीचा बेत रद्द करत विरारमधील घरी ७ दिवसांच्या गणेशोत्सवाची तयारी केली आहे. अशी अनेक उदाहरणे या वर्षी पाहायला मिळाली आहेत.

ज्यांनी आपल्या गावी स्थापन होणारा गणपती विरारमध्ये स्थापन करून गणेशोत्सव साजरा करायला सुरवात केली आहे. त्यामुळे करोना महामारीने एका अर्थाने कोकणात वसणाऱ्या बाप्पाचे वसईत स्थलांतर केले आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे अगदी सध्या पद्धतीने हा उत्सव साजरा होत असला तरी उत्साह मात्र कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.