आरक्षणाच्या गोंधळामुळे खासगी महाविद्यालयांत प्रवेश घ्यावा लागलेले वैद्यकीय अभ्यासक्रमाचे अडीचशेहून अधिक विद्यार्थी अद्यापही शुल्क प्रतिपूर्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या वर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी अचानक मराठा आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी लागू केलेल्या आरक्षणाचा फटका खुल्या गटातील विद्यार्थ्यांना बसला. आरक्षणाबाबत सातत्याने बदलेल्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत असतानाही खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागला. त्यानुसार शासकीय महाविद्यालय आणि खासगी महाविद्यालयांतील शुल्काचा फरक विद्यार्थ्यांना देण्याचे शासनाने जाहीर केले. त्यानुसार ऑक्टोबर २०१९ मध्ये शुल्कातील फरक देण्याचा निर्णयही शासनाने प्रसिद्ध केला. त्यानंतर १०६ विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली. मात्र, ही यादी निवडण्यात आलेल्या निकषांवर पालकांनी आक्षेप घेतला. प्रत्यक्षात २५९ विद्यार्थ्यांना गोंधळाचा फटका बसला असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या शुल्काबाबत अद्यापही कार्यवाही झालेली नाही.

विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्तीची प्रतीक्षा

झाले काय?  आरक्षणाच्या गोंधळामुळे शासकीय महाविद्यालयांऐवजी खासगी महाविद्यालयांत प्रवेश घ्यावे लागलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना शासनाकडून शासकीय महाविद्यालय आणि खासगी महाविद्यालयांतील शुल्काचा फरक देण्याचे शासनाने जाहीर केले होते. तो अद्याप देण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांचे पहिले वर्ष संपले आहे आणि आता संस्थांनी दुसऱ्या वर्षीचे लाखो रुपये शुल्क मागण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.