नसलेल्या मिशीवर तूप लावून मोदीनामाचा जप करत मतांचा जोगवा मागणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभा निवडणुकीत मतदारांनी साफ झिडकारले. महाराष्ट्रात दहा जागा लढविणाऱ्या मनसे उमेदवारांची अनेक ठिकाणी अनामत जप्त झालीच शिवाय कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघ वगळता अन्यत्र सर्व ठिकाणी मनसेच्या उमेदवारांना लाखभरही मते मिळू शकलेली नाहीत. महाराष्ट्रात मनसे हाच ‘आप’चा ‘बाप’ असल्याचे सांगणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला ‘आप’पेक्षा कमी मते मिळाली आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला सुमारे १५ लाख मते मिळाली होती तर यावेळी सुमारे सात लाख मतांवर समाधान मानावे लागत आहे. यातील गंभीर बाब म्हणजे ‘आप’चा ‘बाप’ असल्याचे सांगणाऱ्या राज यांना ‘आप’ने झटका दिला आहे. ‘आप’ला नऊ लाख ७० हजार मते मिळली तर बसपलाही साडेदहा लाख मते मिळाली आहेत. लोकांना गृहित धरले तर काय होते, हे या लोकसभा निवडणुकीने मनसेला दाखवून दिले असून आगामी विधानसभा निवडणुकीतही यापेक्षा वेगळे चित्र नसेल असा विश्वास सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केला.
मोदी लाटेत देशभरातील दिग्गज उमेदवारांचे पानिपत झाले. त्यातच मनसेही महाराष्ट्रात वाहून गेली. मनसेसाठी हा धक्का मोठा असून मुंबईत शिवसेनेकडून हस्तगत केलेल्या दादरच्या बालेकिल्ल्याला शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांच्या विजयामुळे खिंडार पडले आहे. २००६मध्ये पक्षाच्या स्थापनेपासून मनसेला महापालिका, विधानसभा व गेल्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी भरभरून मतदान केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने १४३ जागा लढविल्या होत्या व त्यांना २५ मते मिळून त्यांचे १३ उमेदवार विजयी झाले होते तर लोकसभा निवडणुकीत ११ जागा लढवून १५ लाख मते मिळाली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेमुळे मुंबईतील शिवसेना-भाजपच्या सर्व जागा पडल्या होत्या. त्यावेळी मनसेला मुंबईत लाखा लाखांनी मते मिळाली होती. दक्षिण मुंबईत मनसेचे बाळा नांदगावर यांनी सुमारे एक लाख ५९ हजार मते मिळवून दुसऱ्या क्रमांवर उडी घेतली होती. शिवसेना त्यावेळी तिसऱ्या स्थानावर फेकली गेली. सेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये शिवसेनेचे सर्व नगरसेवक पराभूत होऊन तेथे मनसेने बाजी मारली होती. विधानसभेतही मनसेने मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर पालिका निवडणुकीतही मनसेने मुंबई, ठाणे, पुणे व नाशिकमध्ये मोठी बाजी मारली होती. नाशिक महापालिकेत सत्ता आल्यानंतर तेथील चित्र बदलले तसेच राज यांनी शब्द दिल्यानुसार ते नाशिक, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कामाचा आढवा घेतील, ही अपेक्षा फोल ठरली. पक्ष स्थापनेपासून राज ‘लोकांना गृहित धरू नका’ असे भाषणांत नेहमी सांगत होते. प्रत्यक्षात त्यांनीही लोकांना गृहित धरले मात्र आम्हाला गृहित धरता येणार नाही, हेच जनतेने यावेळी त्यांना दाखवून दिले. मुंबईत राज यांच्याच मतदारसंघात मनसेचे आदित्य शिरोडकर यांना अवघ्या ७३ हजार मतांवर समाधान मानावे लागले आहे तर उत्तर पश्चिम येथे महेश मांजरेकर यांना ६५ हजार मते मिळाली आहेत. ठाणे मतदारसंघात मनसेला अवघी ४४ हजार मते मिळाली असून ज्या पुण्यावर राज यांची भिस्त होती तेथेही दिपक पायगुडे यांना लाखभर मते मिळाली नाहीत.
मनसेची अनामत जप्त!
नाशिक मतदारसंघात एकूण वैध मतांच्या एक षष्टमांश मते मिळवू न शकल्याने मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. तेथे छगन भुजबळ यांचा पराभव करत शिवसेनेचे हेमंत गोडसे विजयी झाले आहेत. पुण्यातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दीपक पायगुडे यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. अनामत रक्कम परत मिळविण्यासाठी त्यांना १,६५,७७० मते मिळण्याची आवश्यकता होती.