News Flash

‘बेस्ट’वर अधिक प्रवासी भार

सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने बेस्ट बसवरील प्रवासी भार वाढत आहे.

प्रवासी संख्या २१ लाखांवर; ऑगस्टपर्यंत १०० नवीन बस दाखल करण्याचे उद्दिष्ट

मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने बेस्ट बसवरील प्रवासी भार वाढत आहे. गेल्या सव्वा महिन्यात बेस्टच्या प्रवासी संख्येत तीन लाख ४७ हजार प्रवाशांची भर पडली आहे. वाढत जाणारी प्रवासी संख्या लक्षात घेता विलंब झालेल्या भाडेतत्त्वावरील बसगाडय़ा लवकरात लवकर ताफ्यात दाखल करण्याचा प्रयत्न बेस्ट प्रशासन करीत आहे. ऑगस्टअखेपर्यंत बेस्टच्या ताफ्यात १०० नवीन बसगाडय़ा दाखल होतील, असा आशावाद एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.

दुसऱ्या लाटेमुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आले. बेस्ट बसमधून फक्त ५० टक्के  प्रवासी वाहतुकीचीच परवानगी होती. जसजशी करोना रुग्णांची संख्या कमी झाली आणि सरकारी तसेच खासगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ झाली, त्यानुसार उपक्र माने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मुंबई पालिका व राज्य सरकारकडे मागितली होती. त्यानुसार परवानगी देण्यात आली आणि ७ जून २०२१ पासून बेस्ट बस पूर्ण प्रवासी क्षमतेने धावू लागल्या. मात्र उभ्याने प्रवासी न घेण्याची अट घालण्यात आली होती. त्याप्रमाणे सध्या बेस्टची वाहतूक होत आहे. परंतु कार्यालयीन उपस्थिती वाढल्याने, उद्योगधंदेही सुरू झाल्याने बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. त्यातच अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी असल्याने अनेकांसमोर कार्यालय गाठण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे अनेकांनी बेस्टचा पर्याय निवडला आहे.

बेस्टमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जूनला १८ लाख १३ हजार प्रवाशांनी बेस्ट बसमधून प्रवास केला होता आणि उपक्रमाला एक कोटी ५६ लाख रुपये महसूल मिळाला होता. गेल्या आठवडय़ात प्रवासी संख्या २१ लाख ६० हजार ५८६ पर्यंत पोहोचली आणि एक कोटी ८६ लाख रुपये महसूल मिळाला आहे. प्रवासी संख्या आणखी वाढण्याचीही शक्यता लक्षात घेता आधीच उशीर झालेल्या भाडेतत्त्वावरील बसगाडय़ा ताफ्यात दाखल करण्यासाठी बेस्टची धडपड सुरू आहे. अधिक बस चालवल्यास उत्पन्न वाढण्याची आशा आहे.लोकल सेवा खुली करण्याची मागणी

पश्चिम रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दररोजची प्रवासी संख्या १० ते १२ लाख, तर मध्य रेल्वेवरील प्रवासी संख्या १५ ते १६ लाखांपर्यंत आहे. सामान्य प्रवासी लोकल प्रवासासाठी धडपडत असून अनेक जण अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचे बनावट ओळखपत्र बनवून त्याद्वारे प्रवास करत आहेत, तर काही प्रवासी विनातिकीट प्रवास करीत आहेत. सर्वसामान्यांची गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी लोकल खुली करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 12:37 am

Web Title: more passenger load on best ssh 93
Next Stories
1 मूर्तिकारांवर शासन निर्णयाची टांगती तलवार
2 ज्येष्ठ नागरिकाला दीड लाख रुपयांना ऑनलाइन गंडा
3 तराफा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांचे आंदोलन
Just Now!
X