सर्वाधिक आठ वेळा मी निवडून आल्याने विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी माझी निवड व्हावी, अशी इच्छा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. हंगामी अध्यक्षपदासाठी सभागृहाचा जो सर्वांत वरिष्ठ सदस्य असतो त्याची परंपरेनुसार निवड केली जाते याचे पालन राज्यपाल करतील अशी आशा आहे, असेही थोरात यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

थोरात म्हणाले, “काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्याने मी सोनिया गांधी, केंद्रीय नेतृत्व आणि आमच्या सर्व ४४ आमदारांचे आभार मानतो. आम्ही सर्व आमदार एकत्र आहोत. माझ्यावर पक्षाने टाकलेली ही मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्रात सध्या वेगळा काळ सुरु आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात आमचा परफॉर्मन्स चांगला राहिल याची खात्री देतो.”

“हंगामी अध्यक्षपदी सर्वाधिक कार्यकाळ सभागृहाचा सदस्य असलेल्या व्यक्तीची निवड केली जाते. मी आठ वेळा निवडून आलो आहे त्यामुळे माझे नाव हंगामी अध्यक्षपदासाठी वरच्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर इतरही काही लोकांची नावे आहेत. मात्र, यामध्ये राज्यपालांनी कुठलाही राजकीय भाव न ठेवता अध्यक्षांची नियुक्ती करावी अशी आशा आहे. उद्या बहुमत चाचणीवेळी सभागृहात कोणताही गोंधळ होणार नाही याची आम्ही सर्व दक्षता घेऊ. आमच्याकडे सध्या १६२ सदस्यांचे पत्र असले तरी ते उद्यापर्यंत हा आकडा १७२ पर्यंत गेलेला असेल,” असा विश्वास यावेळी थोरात यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अनेक वर्षांचा अनुभव आपल्या पाठीशी असल्याने सेवाज्येष्ठतेनुसार विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी आपली निवड व्हावी अशी इच्छा भाजपा नेते कालिदास कोळंबकर यांनी देखील व्यक्त केली आहे.