सध्या संपूर्ण देशभरात करोना विषाणूने विळखा घातलेला आहे. महाराष्ट्रात करोना बाधित रुग्णांची संख्याही प्रत्येक दिवशी वाढत चाललेली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवस लॉकडाऊन घोषित केलं आहे. या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. जिवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व गोष्टींची दुकानंही बंद करण्यात आलेली आहेत. मात्र याच काळात अनेक लोकांना सतत घरात राहिल्यामुळे नैराश्य, आजुबाजूच्या वातावरणामुळे तणाव अशा समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे लोकांचं मानसिक स्वास्थ्य कायम राखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाने महत्वाचं पाऊल उचललं आहे.

एम-पॉवर या संस्थेच्या सोबतीने राज्य सरकारने मानसिक आरोग्याविषयी शंका निवारण करण्यासाठी १८००-१२०-८२००५० हा टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे. या उपक्रमात प्रख्यात मानसोपचात तज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य समुपदेशक नागरिकांना मानसिक आरोग्याविषयी महत्वाच्या गोष्टी सांगणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ही सेवा मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा ३ भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला सध्याच्या खडतर काळात मानसिक आजार किंवा नैराश्याला सामोरं जावं लागत असेल त्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा अशी विनंती सरकारने केली आहे.

करोनाचा सामना करताना सध्या सर्वजण आपल्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहिल याची काळजी घेत आहे. मात्र सघ्याच्या तणावग्रस्त वातावरणात मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं नाही. सध्याच्या काळात कोणालाही चिंता वाटणं स्वाभाविक आहे, परंतु यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने तयार केलेल्या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा अशी माहिती एम-पॉवरच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीरजा बिर्ला यांनी दिली. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनीही सध्याच्या काळात आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राखणं गरजेचं असल्याचं सांगत, कोणत्याही नागरिकाला नैराश्य येत असेल तर या सुविधेचा लाभ घ्यावा ही विनंती केली आहे.