महामुंबईतील अनेक शहरांतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत

संजय बापट, लोकसत्ता

मुंबई: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्प मार्गी लागल्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आपले लक्ष आता बहुचर्चित विरार- अलिबाग बहुउद्देशीय महामार्गाच्या (मल्टिमोडल कॉरिडॉर) उभारणीकडे केंद्रित के ले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीवर परिणामकारक उपाय म्हणून उभारण्यात येणारा सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्चाचा आणि १२३ किमी लांबीचा हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा प्रकल्प रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यास संमती देण्यात आली.

महानगर प्रदेशातील वाढते उद्योग-व्यवसाय, भिवंडी परिसरातील गोदामे, जवाहरलाल नेहरू बंदरावरून होणारी आयात-निर्यात, नवी मुंबई विमानतळामुळे महानगर प्रदेशात येणारे नवनवीन प्रकल्प आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तसेच मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई आणि पनवेल या शहरांवर पडणारा वाहतूक कोंडीचा ताण दूर करण्यासाठी विरार-अलिबाग बहुउद्देशीय महामार्गाची आखणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने के ली आहे. विरार ते अलिबाग हा १२३ किमी लांबीचा आणि ९० ते १२५ मीटर रुंदीच्या या मार्गावर सोळा मार्गिका तसेच सेवा रस्ता आणि मेट्रो मार्गिकाही ठेवण्यात आली आहे. या महामार्गासाठी १०४ गावातील सुमारे १२००हेक्टर जमीन संपादित करावी लागणार असून त्यापैकी ५२ गावात संयुक्त मोजणी झाली आहे. यासाठी आवश्यक भूसंपादनासाठी सुमारे २० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा बहुउद्देशीय महामार्ग मुंबई- अहमदाबाद, मुंबई-नाशिक-आग्रा, मुंबई-गोवा, मुंबई- बंगळूरु तसेच  मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग यांना जोडण्यात येणार असल्यामुळे विमानतळ, गोदामे आणि जेएनपीटीतून बाहेर पडणारी अवजड वाहतूक थेट या मार्गिके ने जाणार असल्याने महानगर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये विशेषत: अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर होऊ शकेल.

बोगद्याचे कामही मार्गी

घोडबंदर रस्त्याच्या रुंदीकरणात येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता, ठाणे ते बोरिवली असा बोगद्यातून रस्ता बांधण्याचा प्रकल्प आता मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प आधी रस्ते विकास मंडळाकडून के ला जाणार होता. घोडबंदर रस्त्याच्या बाजूला असलेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आणि एका बाजूला असलेल्या खाडीमुळे रस्ता रुंदीकरणाला वाव उरलेला नाही. यातूनच गायमुखपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत बोगद्यातून रस्ता उभारण्याची योजना आहे.