शिवसेना दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसैनिकांना राजकीय ऊर्जा देते. त्याप्रमाणेच मनसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पाडवा मेळावा सुरू केला. त्यानंतर आता भारतीय जनता पार्टीकडूनही राज्यस्तरीय मेळाव्याची तयारी सुरु आहे. 6 एप्रिल रोजी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर हा ‘महा भाजप, महा मेळावा’ मुंबईतील बीकेसी मैदानावर होणार आहे.

यावर्षीचा हा पहिला मेळावा असून यापुढे ही परंपरा कायम सुरू राहणार आहे. त्यासाठी राज्यभर जोरदार तयारी सुरू आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा या मेळाव्यासाठी येणार आहेत. मुंबईमध्ये मेळावा घेऊन शिवसेनेला शह देण्याची भाजपाची रणनीती आहे. भाजपने बूथ स्तरावर मेळाव्याची तयारी सुरू केली असून पक्षाच्या सर्व नेत्यांना तशा जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. भाजपा प्रदेशअध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज औरंगाबाद इथं त्यासंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीला जालना, औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं होतं. तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे नांदेड, बीड तसेच हिंगोलीची जबाबदारी देण्यात आली आहे.

तर संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे लातूर, उस्मानाबाद येथील आढावा घेण्याच्या पक्षाकडून सूचना करण्यात आलेल्या आहेत. स्वतः मुख्यमंत्री नागपूर इथं मेळाव्या संदर्भातील बैठकीचा आढावा घेणार आहेत. औरंगाबाद इथं झालेल्या आजच्या आढावा बैठकीला विधासभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यासह सर्व आमदारांची उपस्थिती होती. एक बूथ 10 कार्यकर्ते आशा पद्धतीनं मेळाव्याच्या तयारीला माणसं उभी करण्यात आली आहेत. सहा तारखेला होणाऱ्या मेळाव्याला किमान तीन ते चार लाख कार्यकर्ते जमवण्याचं पक्षाचं लक्ष आहे. त्या अनुषंगाने तयारी सुरू असून 22 रेल्वे गाड्याची व्यवस्था करण्यात आली आहे.