नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशीही मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला. सोमवारी सकाळपासूनच मुंबईकडे येणाऱ्या धीम्या आणि जलद मार्गावरील लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून ट्रेन उशिरा धावत असल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाडांमुळे लोकल ट्रेनचा खोळंबा झाल्याच्या घटना डिसेंबरमध्ये वाढल्या होत्या. नववर्षाच्या पहिल्या दिवशीही मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. या मागील नेमके कारण काय याबाबत प्रवाशांना कोणतीही माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडली. पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्याही ५ ते १० मिनिटे उशिराने धावत असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत.

मध्य रेल्वेपाठोपाठ हार्बर रेल्वेवरील प्रवाशांनाही मनस्तापाचा सामना करावा लागला. वाशीजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक उशिराने सुरु होती. गेल्या दहा दिवसांपासून हार्बर मार्गावर सावळागोंधळ सुरु असून या मार्गावर सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे अखेर शनिवारी रेल्वेप्रवाशांचा संताप अनावर होऊन बेलापूर व नेरुळ स्थानकांत रेल्वेप्रवाशांनी मोटरमन तसेच गार्ड यांना घेराव घातला होता.

गर्दीच्या वेळी लोकल गाड्या आणि तेही जलद लोकल उशिराने धावत असतात. मात्र त्याचे कारण रेल्वेकडून स्पष्ट केले जात नाही. एकीकडे लोकल गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा झाल्याचा दावा मध्य रेल्वेकडून केला जात असला तरी गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांना लोकलचे वेळापत्रक बिघडल्याचे दिसून येत आहे. धुक्यामुळे तसेच तांत्रिक बिघाडांमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान,जानेवारी २०१४ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत मध्य रेल्वेवर रेल्वे रुळाला तडा गेल्याच्या २६० घटना घडल्या होत्या. तर डिसेंबर २०१६ ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत ९७ घटना घडल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. लोकल गाड्यांच्या वेळापत्रकाचे योग्य नसलेले नियोजन आणि देखभाल-दुरुस्तीकडे होत असलेले दुर्लक्ष  यामुळे मध्य रेल्वेवर लोकल ट्रेनचा खोळंबा होत असल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.