आधीच मर्यादित असलेली वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प * मध्य आणि पश्चिम रेल्वे सेवा पूर्णपणे बंद * अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे हाल

मुंबई : कडाडणाऱ्या विजा आणि ढगांच्या गडगडाटासह मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारी मुंबई पूर्णपणे थांबवली. रेल्वे, रस्ते पाण्याखाली गेल्याने पहाटेपासूनच वाहतूक ठप्प झाली. सखल भागांसह सर्वच ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला होता; तर मध्य आणि पश्चिम रेल्वेची अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीची वाहतूकही थांबवण्यात आली. सध्या मुंबईत ये-जा करण्यासाठी महत्त्वाचे साधन असलेल्या एसटीच्या आगारांतही पाणी साचल्याने एसटीच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या.  त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रचंड हाल सोसावे लागले.

पश्चिम रेल्वेवरील गॅ्रण्ट रोड ते चर्नी रोड, लोअर परळ ते प्रभादेवी, महालक्ष्मी ते मुंबई सेन्ट्रल, दादर ते माटुंगा, माटुंगा ते माहीम या पट्टय़ांत बुधवारी पहाटेपासूनच रुळांवर पाणी साचले. त्यामुळे सकाळी ७.३० च्या सुमारास चर्चगेट ते अंधेरी दरम्यान लोकल फे ऱ्या रद्द करण्यात आल्या. फक्त विरार ते अंधेरी दरम्यान लोकल सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने कामावर जाणारे अत्यावश्यक सेवेतील काही कर्मचारी रेल्वे स्थानकातून पुन्हा घरी परतले. तर ज्या प्रवाशांनी पहाटे लोकल पकडून कार्यालय गाठण्यासाठी प्रयत्न के ला ते प्रवासी लोकल पुढे जाऊ न शकल्याने रुळावर उतरून जवळचे स्थानक गाठले आणि स्थानकाबाहेरून मिळेल त्या वाहनाने कार्यालय, रुग्णालय  गाठण्याचा प्रयत्न के ला. याशिवाय मध्य रेल्वेवरील शीव, चुनाभट्टी, कु र्ला स्थानकांतील रूळ पाण्याखाली गेल्याने सीएसएमटी ते ठाणे, सीएसएमटी ते वाशी लोकल सेवा बंद ठेवण्यात आली. उपनगरातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ठाणे ते कसारा, कर्जत आणि वाशी ते पनवेल विशेष शटल सेवा चालवण्यात आल्या. पाणी ओसरले नसल्याने आणि पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने दुपापर्यंत मध्य रेल्वेवरील लोकल सेवा पूर्ववत झाली नव्हती.

सकाळी ७.५० च्या सुमारास चर्चगेट ते विरार डाउन जलद मार्ग आणि अंधेरी ते चर्चगेट जलद मार्गावरून पहिली लोकल सोडण्यात आली. परंतु सातत्याने पडणारा पाऊस आणि पुन्हा साचणाऱ्या पाण्यामुळे सकाळी ९.३० वाजता चर्चगेट ते वांद्रे दरम्यान सर्व मार्गावरील लोकल फे ऱ्या रद्द करण्यात आल्या आणि वांद्रे ते डहाणू लोकल मार्ग सुरू ठेवला. काही  प्रमाणात ओसरलेल्या पाण्यामुळे दुपारी साडेबारा वाजता पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते वांद्रे दरम्यान जलद लोकल मार्ग पूर्ववत झाला. त्यामुळे चर्चगेट ते डहाणूपर्यंत जलद लोकल गाडय़ा हळूहळू सुरू करण्यात आल्या. सायंकाळी ४ वाजता धिमा मार्गही सुरू झाला व चचर्गटे ते विरार लोकल धावली. तर पाचच्या सुमारास वांद्रे ते चर्चगेट धिमी लोकल सुरू झाली.

वाहने अडकल्याने हाल

* पावसामुळे रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. शहरातील हिंदमाता, गांधी मार्केट, शीव रोड क्रमांक २४, वडाळा पूल, किंग्ज सर्कल, भाऊ दाजी रोड, खोदादाद सर्कल, मडकेबुवा चौक, पूर्व उपनगरांमधील कुर्ला आगार ते शीतल सिनेमा, शेल कॉलनी, कल्पना सिनेमा, बैल बाजार, पश्चिम उपनगरांतील मालाड सबवे, वांद्रे टॉकीज — एस. व्ही. रोड, अंधेरी मार्केट, शास्त्रीनगर, ओबेरॉय मॉल- गोरेगाव, मीलन सबवे, वाकोला-सांताक्रूझ (पूर्व) या परिसरांत पाणी साचल्यामुळे बेस्टच्या बसची वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली.

* साचलेल्या पाण्यात बेस्टच्या सुमारे ३० बसगाडय़ा अडकून पडल्या होत्या. यापैकी २३ गाडय़ा सुरू करण्यात बेस्टच्या कर्मचाऱ्यांना यश आले. परंतु मोठय़ा प्रमाणावर पाणी साचल्यामुळे बेस्टचे कर्मचारी सात बसगाडय़ांपर्यंत पोहोचू शकले नाहीत.

* मुंबई सेन्ट्रल येथील एसटी आगारही पाण्याखाली गेले. या आगारात एसटीच्या अनेक गाडय़ा उभ्या होत्या. त्यांचे टायरही दिसत नव्हते. मुंबई महानगरातही एसटीच्या दररोज होणाऱ्या १ हजार ते १,२०० फे ऱ्यांपैकी के वळ ५०० ते ६०० फे ऱ्याच होऊ शकल्या.

मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना फटका

सकाळी साडेसातच्या सुमारास जयपूरहून मुंबई सेन्ट्रलला जाणारी गाडी बोरिवली स्थानकापर्यंतच चालवण्यात आली. त्यामुळे मुंबई सेन्ट्रलपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना सामानासह जाण्यासाठी वाहतुकीसाठी दुसरा पर्याय शोधावा लागला. रिक्षा, टॅक्सी करताना दुप्पट पैसे मोजावे लागले. दिल्ली ते मुंबई राजधानी एक्स्प्रेसही अंधेरी स्थानकापर्यंत चालवण्यात आली. मुंबई सेन्ट्रल येथून सुटणाऱ्या एक्स्प्रेस या दादर, अंधेरी, बोरिवली येथूनच सायंकाळी अहमदाबाद, भूज, जयपूरसाठी चालवण्यात आल्या. मुंबईत ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे व रस्ते वाहतुकीचेही तीनतेरा वाजल्याने या स्थानकापर्यंत पोहोचणार कसे असा प्रश्न प्रवाशांना पडला. मुंबई ते बंगळूरु, लखनऊ या गाडय़ांच्या वेळेत बदल करत त्या सायंकाळी ७ नंतर सोडण्याचा निर्णय झाला.

 

ऑनलाइन सुनावणीही तहकूब

मंगळवारी रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले. उच्च न्यायालयाचा कर्मचारीवर्गही त्यामुळे न्यायालयात पोहोचू शकला नाही. परिणामी बुधवारचे ऑनलाइन सुनावणीचे कामकाज उच्च न्यायालय प्रशासनाने दिवसभरासाठी तहकूब करत सुट्टी जाहीर केली. प्रशासनाने बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दिवसभराचे कामकाज तहकूब करत असल्याचे जाहीर केले. बुधवारी होणारी सगळी प्रकरणे गुरुवारी घेतली जातील. बुधवारी मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर महत्त्वाच्या जनहित याचिकांवर सुनावणी होणार होती. शिवाय अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ यांनी केलेल्या जामीन याचिकेवरही बुधवारी सुनावणी होणार होती.