News Flash

मुंबई पोर्ट ट्रस्ट कात टाकणार

या प्रकल्पाचा हेतू पर्यटन व नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा असल्याचे ट्रस्टच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

सागरी क्रीडा, रो-रो सेवा, मरिनासाठी निविदा प्रक्रिया सुरू

‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ आता कात टाकण्याच्या तयारीत असून ट्रस्टच्या मुंबईतील मोक्याच्या जागेवर सागरी क्रीडा प्रकार, मरिना, रो-रो सेवा, फ्लोटींग रेस्टॉरंट, गृहप्रकल्प आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प कार्यान्वित करणार आहे. अमेरिका व सिंगापूर येथील बंदरांच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठीच्या निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. मात्र, अशा घोषणा अनेक वर्षांपासून होत असल्याने त्या कितपत सत्यात उतरणार? अशी शंका काही जाणकारांनी व्यक्त केली आहे.

‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ने आपल्याकडील जागा व सागरी किनाऱ्याची असलेली उपलब्धता याचा सागरी माल वाहतूकी व्यतिरिक्त वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रस्टने या प्रकल्पासाठीचा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ट्रस्टच्या आखत्यारित येणारी ५०० हेक्टरची जागा ते वापरणार आहेत. या प्रकल्पात मरिना, सर्व प्रकारचे सागरी क्रिडा प्रकार तसेच रो-रो सेवांसारखे अंतर्गत जलवाहतूकीच्या सेवांचाही यात समावेश आहे. तसेच पुढे जाऊन नाटय़गृहे, सागरी संग्रहालय, सायकलींचे मार्ग, गृहप्रकल्प, मनोरंजनासाठीची केंद्रे आदींची निर्मिती देखील करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा हेतू पर्यटन व नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा असल्याचे ट्रस्टच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. यानंतर संपूर्ण मुंबई शहराच्या किनारपट्टीचा अशा उपक्रमांसाठी वापर करता येईल का? याचीही चाचपणी करण्यात येणार आहे. एकंदर या प्रकल्पाचा आराखडा कसा असावा यासाठी ट्रस्टने आंतरराष्ट्रीय निविदा काढली असून देशभरातून ६ सल्लागार कंपन्यांनी आपापले प्रकल्प आराखडे ट्रस्टकडे १५ नोव्हेंबरला सादर केले आहेत. या प्रकल्प आराखडय़ांचे सादरीकरण २२ नोव्हेंबरला ट्रस्टच्या कार्यालयात होणार असून येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत यातील एक कंपनीचा प्रकल्प आराखडा मंजूर करण्यात येईल असे ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, मुंबईसह महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यांवर असे उपक्रम उभारण्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असून ती अंमलात केव्हा येणार की हे देखील अळवावरचे पाणी ठरणार अशी चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 1:47 am

Web Title: mumbai port trust will make ambitious project on its own land
Next Stories
1 राज्यात पुन्हा गारठा
2 कळवा-मुंब्रादरम्यान रुळाला तडे; मध्य रेल्वे विस्कळीत
3 सायरस मिस्त्रींनी कंपनीचे मोठे नुकसान केले: टीसीएस
Just Now!
X