हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली होती. सकाळच्या वेळेसच रेल्वेसेवा ठप्प झाल्यानं लोकांना रेल्वे प्रवासाची मुभा असलेल्या आणि अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले होते. परंतु रेल्वेनं युद्धपातळीवर हे काम हाती घेत तांत्रिक बिघाड दुरूस्त केला. त्यानंतर हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा पूर्ववत झाली. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करत तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवा ठप्प झालेली रेल्वेसेवा सुरूळीत झाल्याची माहिती दिली.

“वडाळा इथे रुट पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कुर्ला- वडाळा सेक्शनमध्ये काही ट्रेन्स उभ्या आहेत. तांत्रिक बिघाड ठिक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरी-गोरेगाव या मार्गावर रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे,” अशी माहिती शिवाजी सुतार यांनी दिली यापूर्वी ट्वीटरद्वारे दिली होती. त्यानंतर सकाळी ६ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला ही सेवा सुरू करण्यात आली.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला डाऊन मार्गावरील वाहतुकही सुरळीत झाली आहे. ७ वाजून ५ मिनिटांपासून सर्व वाहतूक सुरळीत झाल्याचं शिवाजी सुतार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितलं. सध्या मुंबईत अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि महिला प्रवाशांसाठी रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. तसंच लवकरच सर्व प्रवाशांसाठी रेल्वेसेवा सुरू करण्यात यावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्र विजय वडेट्टीवार यांनीदेखील ट्विटरवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत लवकरच लोकल सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं म्हटलं होतं.