विद्यापीठाच्या द्वितीय, तृतीय वर्षांच्या सत्र परीक्षा एकाच दिवशी

मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळानंतर आता पदवीच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या नियोजनामध्येही मोठा घोळ घालण्यात आला आहे. द्वितीय व तृतीय वर्षांच्या सत्र परीक्षा एकाच दिवशी सकाळ आणि दुपारच्या वेळेमध्ये ठेवण्यात आल्यामुळे पदवीच्या प्राध्यापकांची पर्यवेक्षण आणि परीक्षा घेण्यासाठी चांगलीच दमछाक होणार आहे. परीक्षा संपूर्ण दिवसभर सुरू राहणार असल्याने इतर वर्गाचे अध्ययन आणि परीक्षा एकाच वेळेस कशा हाताळायच्या, असा प्रश्न महाविद्यालयांसमोर उभा राहिला आहे.

विद्यापीठाच्या निकाल दिरंगाईमुळे महत्त्वाच्या पदाच्या जागी प्रभारी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या प्रभारींकडून आधीच्या सत्राच्या निकालाची विस्कटलेली घडी बसविताना मात्र पुढील सत्र परीक्षांचे नियोजन कोलमडले आहे. आत्तापर्यंत फक्त तृतीय वर्षांच्या परीक्षा या विद्यापीठाकडून घेतल्या जात होत्या. तृतीय परीक्षांच्या वेळापत्रकानुसार प्रथम व द्वितीय वर्षांच्या परीक्षांचे नियोजन महाविद्यलयांकडून करण्यात येते. तृतीय वर्षांच्या परीक्षेबरोबरच आतापर्यंत महाविद्यालयाच्या स्तरावर असलेल्या प्रथम, द्वितीय सत्राच्या परीक्षांचे नियोजनही विद्यापीठाने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार करायचे आहे. या तिन्ही वर्षांच्या परीक्षांच्या नियोजनामध्ये विद्यापीठाने मात्र मोठा घोळ घालून ठेवला आहे. या वर्षी दोन परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या असून सकाळी ११ पासून तृतीय वर्षांची तर त्याच दिवशी दुपारी तीनपासून द्वितीय वर्षांची परीक्षा असणार आहे. दोन्ही परीक्षांमध्ये शिक्षकांचा संपूर्ण दिवस जाणार असल्याने प्रथम वर्षांच्या वर्गाना या कालावधीत सुट्टी देण्याशिवाय महाविद्यालयांना पर्याय नाही. तसेच मोजक्याच संख्येने उपलब्ध असलेल्या पदवीच्या शिक्षकांमार्फत दिवसभर परीक्षा कशा हाताळणे अवघड असल्याने कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राध्यापकांची मदत महाविद्यालयांना घ्यावी लागणार आहे.

पदवीच्या शिक्षकांचा कालावधी साधारणपणे दुपारी १२ पर्यंतचा असतो. परंतु या परीक्षांच्या विचित्र वेळांमुळे या शिक्षकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबणे अपरिहार्य असणार आहे. तसेच काही छोटय़ा महाविद्यालयांमध्ये जागेअभावी अकरावी व बारावीच्या वर्गानाही सुट्टय़ा द्याव्या लागणार आहेत.

‘आमच्याकडे वाणिज्य शाखेचे द्वितीय व तृतीय वर्षांचे असे एकूण सुमारे १२०० विद्यार्थी परीक्षेला बसतात. त्यात वाणिज्य शाखेमध्ये एका अभ्यासक्रमामध्ये सुमारे १२ पर्यायी विषय आहेत. तेव्हा एकाच दिवशी इतक्या मोठय़ा संख्येने विविध अभ्यासक्रमांची परीक्षा घेणे फारच अवघड असेल.एकाच दिवशी परीक्षा असल्याने शिक्षक आणि महाविद्यालयांवर मोठा ताण येणार आहे,’ असे डहाणूकर महाविद्यलयाचे उपप्राचार्य ज्ञानेश्वर डोके यांनी व्यक्त केले. ‘द्वितीय आणि तृतीय सत्राच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यातच घेणे गरजेचे होते. परीक्षांचे योग्यरीतीने नियोजन केले असते तर इतका ताण महाविद्यालयांना आला नसता. आता परीक्षांमध्येच संपूर्ण नोव्हेंबर महिना त्यानंतर मूल्यांकन अशी सर्वच चक्रे लांबली आहेत. निकाल विलंबामुळे बिघडलेली परिस्थिती विद्यापीठाला सावरता आली असती. परंतु परीक्षांचे नियोजन चुकल्यामुळे उन्हाळी सत्राच्या परीक्षा उन्हाळी सुट्टय़ांमध्ये घ्याव्या लागणार आहेत,’ असे साठय़े महाविद्यालयाच्या प्राचार्य  कविता रेगे यांनी सांगितले.

अधिकृत वेळापत्रक अद्याप नाही

विद्यापीठाने द्वितीय सत्र परीक्षा पुढे ढकलल्याचे माध्यमामधून जाहीर केले असले तरी फेरबदल केलेले अधिकृत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.