मुंबई विद्यापीठाचा उच्च न्यायालयात अजब दावा; निकाल जाहीर करण्यासाठी आता ६ सप्टेंबरचा वायदा

उत्तरपत्रिकांच्या ऑनलाइन मूल्यांकनामुळे आधीच विलंब झालेले निकाल गुरुवापर्यंत (३१ऑगस्ट) जाहीर करण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न केले गेले. मात्र गणेशोत्सव आणि मंगळवारच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर तो जाहीर करण्यास पुन्हा विलंब झाल्याचा अजब दावा मुंबई विद्यापीठातर्फे गुरुवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. परंतु हे निकाल ६ सप्टेंबपर्यंत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील, असा दावा करत निकाल जाहीर करण्याची नवी तारीखही विद्यापीठातर्फे या वेळी न्यायालयाला सांगण्यात आली. निकाल जाहीर करण्यासाठीची विद्यापीठाची ही आतापर्यंतची सहावी मुदतवाढ आहे.

निकाल जाहीर करण्याबाबत विद्यापीठाने घातलेल्या गोंधळाच्याविरोधात विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एवढेच नव्हे, तर निकालाच्या या विलंबामुळे त्यांच्या करिअरवर विपरीत परिणाम होत असून त्यांना या सगळ्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाची आर्थिक नुकसानभरपाई आदेश देण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती अनुप मोहता आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळेस निकाल लावण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र गणेशोत्सव आणि मंगळवारच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळामुळे निकाल जाहीर करण्यास आणखी विलंब झाल्याचा दावा विद्यापीठाच्या वतीने अ‍ॅड. रूई रॉड्रिक्स यांनी केला. मात्र त्याचवेळेस विधि विभागाच्या पाच आणि तीन वर्षांच्या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. याशिवाय कला शाखेच्या १५३ पैकी १५१ परीक्षांचे, विज्ञान शाखेच्या विविध अभ्यासक्रमाच्या ४७ पैकी ४३ परीक्षांचे, तर वाणिज्य शाखेच्या ५० पैकी ३० परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. परंतु हे सगळे निकाल संकेतस्थळावर अद्याप ‘अपलोड’ करण्यात आलेले नाहीत, अशी माहितीही विद्यापीठातर्फे न्यायालयाला देण्यात आली.

मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडीत होऊन इंटरनेट सेवा बंद पडली. परिणामी विद्यापीठाची संगणकीय प्रणाली बंद पडून निकाल संकेतस्थळावर ‘अपलोड’ करणे शक्य झाले नाही. मात्र अन्य कंपनीकडून ही सेवा घेण्यात आल्याने गुरुवारी सायंकाळपर्यंत निकाल संकेतस्थळावर ‘अपलोड’ करण्यात येतील, असा दावाही विद्यापीठातर्फे करण्यात आला. याशिवाय प्रत्येक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गुणांची माहिती एकत्रपणे संबंधित विद्यापीठाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातच त्यांच्या गुणांची माहिती मिळू शकेल, असेही विद्यापीठातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

  • विद्यापीठाकडून निकाल देण्यास केल्या जाणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून विधिच्या सामाईक प्रवेश चाचणी (सीईटी) विभागालाही तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत ६ सप्टेंबपर्यंत वाढवण्याचे आदेश न्यायालयाने या वेळी दिले.
  • वास्तविक ही मुदतवाढ करणे अशक्य असल्याचा दावा विभागातर्फे करण्यात आला होता. मात्र या प्रकरणी विद्यार्थ्यांची काहीही चूक नाही. त्यामुळे त्यांचे हित लक्षात ठेवून ही मुदतवाढ करण्याचे न्यायालयाने विभागाला बजावले.
  • ३१ ऑगस्टची मुदत संपुष्टात आली तरी मुंबई विद्यापीठाच्या ७६,६२६ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन अद्याप बाकी आहे. तर ४७७ परीक्षांच्या निकालापैकी ३० परीक्षांचे निकाल अजून प्रतीक्षेत आहेत. दरम्यान विद्यापीठाने गुरुवारी ३ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत.

विद्यापीठावर पर्यायी संकेतस्थळ सुरू करण्याची वेळ

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेचे सर्व निकाल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी रात्री उशिरा जाहीर झाले असले तरी संकेतस्थळ कोलमडल्यामुळे विद्यार्थ्यांना गुरुवारीही दिवसभरात निकाल पाहता आला नाही. रविवारपासून कोलमडलेले विद्यापीठाचे संकेतस्थळ मागील चार दिवसांपासून डळमळलेल्या अवस्थेतच आहे. त्यामुळे आता निकालांकरिता पर्यायी संकेतस्थळ सुरू करण्याची वेळ विद्यापीठावर ओढवली आहे.

रविवारी वाणिज्य शाखेचे निकाल जाहीर झाल्यापासून विद्यापीठाचे संकेतस्थळ कोलमडले आहे. वाणिज्यच्या सुमारे लाखभर विद्यार्थ्यांनी एकाच वेळी लॉगइन केल्याने सव्‍‌र्हरवर ताण आल्यामुळे संकेतस्थळ बंद पडले. त्यानंतर सोमवारीही संध्याकाळपर्यंत संकेतस्थळ पूर्ववत झाले नाही. तेव्हा विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी महाविद्यालयात जाण्याच्या सूचना विद्यापीठाने दिल्या. मंगळवारीही संकेतस्थळ सुरू होण्याची कोणतीच चिन्हे नव्हती. विधी शाखेचे उरलेले सर्व निकाल बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. विधीच्या हजारो विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी गुरुवारी सकाळी लॉगइन केल्याने संकेतस्थळ पुन्हा कोलमडले. मात्र गुरुवारी संध्याकाळी सुरू झालेल्या  www.mumresults.in nया पर्यायी संकेतस्थळावर फक्त विधि शाखेचेच निकाल दिसत आहेत.

विधितही मूल्यांकनाचा घोळ

तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विधि शाखेचा निकाल जाहीर झाला. मात्र निकालांतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. तांत्रिक अडचणींमुळे निकाल राखीव राहिलेले विद्यार्थी एका विषयात गैरहजर दाखविणे, ४-६ असे गुण मिळणे, पास असूनही नापासचा शेरा दिसणे असे घोळ कायम आहेत.

‘तक्रारी केलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाला देत आहोत. त्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकनही जलदगतीने करावे,’ अशी मागणी करण्यात येणार आहे,’ असे शासकीय विधि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय नथानी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. तर ‘मूल्यांकनाच्या घोळामधील चुका निदर्शनास आणल्यास तात्काळ पुनर्मूल्यांकन करून देण्यात येईल. तसेच गैरहजर शेरा देऊन राखीव ठेवलेले निकाल येत्या १५ दिवसांमध्ये जाहीर करण्यात येतील,’ असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक अर्जुन घाटुळे यांनी सांगितले.

पेपरला गैरहजर असूनही २१ गुण

विधि शाखेच्या तिसऱ्या वर्षांची परीक्षा दिलेल्या शासकीय विधिी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीला गैरहजर नसूनही त्या पेपरमध्ये २१ गुण मिळाल्याचे समोर आले आहे.