महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासाठी सध्या राजकारणातला पडता काळ सुरु आहे पण या परिस्थितीतही त्यांची कणकवली शहरावरील पकड सैल पडलेली नाही. कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने १७ पैकी ११ जागा जिंकल्या.

खरंतर नारायण राणे भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी झाले असून ते भाजपाच्या कोटयातून खासदारही आहेत. पण कणकवलीमध्ये त्यांना शिवसेना-भाजपा युतीविरोधातच लढावे लागले. राजकीय दृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीत नारायण राणे यांनी आपली राजकीय ताकत दाखवून दिली आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतच राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासमोर भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार संदेश पारकर यांचे कडवे आव्हान होते. नगराध्यक्षपदाची ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. अवघ्या ३७ मतांच्या फरकाने नलावडे निवडून आले. संदेश पारकर हे जिल्ह्याच्या राजकारणातील नारायण राणे यांचे कडवे विरोधक समजले जातात.

२०१४ पासून नारायण राणेंसाठी राजकारणातील पडता काळ सुरु आहे. त्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांचा पराभव झाला. पाठोपाठ नारायण यांना विधानसभा निवडणुकीत कुडाळमधून पराभव स्वीकारावा लागला.