काँग्रेसचे वजनदार नेते नारायण राणे यांना विधानसभा निवडणुकीतील पराभवापाठोपाठ वांद्रे-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत सलग दुसऱ्या पराभवाचा जबर फटका सोसावा लागला. ‘मातोश्री’ निवासस्थानातूनच राजकारणाचा श्रीगणेशा केलेले राणे यांना मातोश्रीच्या अंगणातच पराभव पाहावा लागल्यामुळे त्यांच्या प्रदीर्घ राजकारणाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उमटल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच पराभवाच्या सावटाखाली असलेल्या काँग्रेसलाही राणे यांच्या पराभवामुळे मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीच्या राजकारणातील पदार्पणातच शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी १९ हजार मतांची आघाडी घेऊन नारायण राणे यांना पराभूत केल्याने शिवसेनेत जल्लोष सुरू आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुमन पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे मोठा विजय संपादन केला आहे.
शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे वांद्रे-पूर्व विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत बाळा सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती, तर तासगाव मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने आर. आर. पाटील यांची पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी दिली होती. सुमन पाटील यांच्या विरोधात प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार उभे न केल्याने या मतदारसंघावरील राष्ट्रवादीचे वर्चस्व अबाधित राहणारच होते. त्यानुसार सुमन पाटील यांना एकलाख ३१ हजार २३६ मतांनी भरघोस विजय मिळाला. काँग्रेसचे नेते व शिवसेनेचे कडवे विरोधक नारायण राणे यांच्या उमेदवारीमुळे वांद्रे-पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत राणे यांना कोकणात कुडाळ मतदारसंघात दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची होती. सेनेच्या बालेकिल्ल्यातच त्यांना आपली सारी शक्ती आणि राजकीय पुण्याई पणाला लावावी लागणार होती. सततच्या पराभवामुळे खचलेल्या काँग्रेसच्या दृष्टीनेही ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यामुळे या निवडणुकीवर महाराष्ट्राचे लक्ष केंद्रित झाले होते. प्रत्यक्षात मात्र, मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेने आघाडी घेतली आणि अखेरच्या फेरीपर्यंत ही आघाडी भेदणे राणे यांना शक्यच झाले नाही. त्यामुळे चुरशीची वाटणारी ही निवडणूक अगदीच एकतर्फी झाली, आणि तृप्ती सावंत सहज विजयी झाल्या. विजयाच्या जल्लोषात राणे यांना हिणवण्याच्या नादात शिवसैनिकांनी जिवंत कोंबडय़ा हिडीसपणे नाचविल्याने या कोंबडय़ांची मात्र नाहक फरपट झाली. सावंत यांना या निवडणुकीत ५२,७११ मते मिळाली. राणे यांना दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे ३३,७०१ मते मिळाली असली, तरी सावंत यांनी तब्बल १९ हजारांची घसघशीत आघाडी घेतल्याने, वांद्रे पूर्व मतदारसंघावरील शिवसेनेचे वर्चस्व राणे यांना भेदता आले नाही, हे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत ओवेसी बंधूंचा एमआयएम हा पक्ष महत्त्वाची भूमिका बजावेल, असाही तर्क व्यक्त होत होता. मात्र, एमआयएमच्या रेहबर खान यांना १५ हजार ५० एवढीच मते मिळाली.   

ताकद नसतानाही बेटक्या फुगवू नका – उद्धव ठाकरे</strong>
ताकद नसतानाही उगाच दंडाच्या बेटक्या फुगवून अंगावर येण्याचा प्रयत्न करू नये. शिवसैनिकांची ताकद काय आहे ते कळले असेल. शिवसैनिक हा ढाण्या वाघ आहे. त्याच्या नादाला लागू नका. आशीर्वाद देणारे हात आणि मने नेहमी लक्षात ठेवा. ती दुखवली गेली की काय पदरात पडते हे वांद्रय़ातील निवडणुकीतून स्पष्ट झाले.

shirur lok sabha marathi news
शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव म्हणाले, ‘यासाठी’ ही माझी शेवटची निवडणूक!
chandrapur lok sabha marathi news, sudhir mungantiwar marathi news
लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील मतांची आघाडी टिकवण्याचे भाजप-काँग्रेससमोर आव्हान
congress bastar candidate kawasi lakhma
“यंदा मोदी लाट नाही, आमचा विजय निश्चित”, काँग्रेसच्या उमेदवाराचा दावा
loksatta editorial Supreme court descion regarding candidate affidavit on asstets
अग्रलेख: अपवादांचा अपराध!

पराभवाला मीच जबाबदार – नारायण राणे</strong>
माझ्या पराभवाला मी स्वत:च जबाबदार आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघात अनेक समस्या आहेत. मतदारसंघात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. पण लोकांना सुधारणा नको असाव्यात. पराभवानंतर काही जणांनी आपल्याला निष्ठा शिकविल्या. मला निष्ठा शिकविण्याच्या भानगडीत पडू नका. महापालिकेतील दोन नि पाच टक्क्यांवर अनेकांची घरे चालतात. त्यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नयेत.

वांद्रे पोटनिवडणूक निकाल
तृप्ती सावंत – ५२,७११ (विजयी)
नारायण राणे – ३३,७०३
रेहबर सिराज खान – १५०५०
एकूण मतदान १,०३, ००३