News Flash

नवी मुंबई विमानतळ नामांतर वाद : राज ठाकरे म्हणतात, “स्वत: बाळासाहेब असते तर त्यांनी…”

नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. तशी मागणी केली जात आहे असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली नवी मुंबई विमानतळाच्या नावासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यावर सरकार ठाम असतानाच या विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची कृती समितीची मागणी कायम आहे. असं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे. तसेच या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासंदर्भातील प्रश्नावर त्यांनी आपलं मत मांडताना बाळासाहेब असते तर त्यांनी काय म्हटलं असतं यासंदर्भातही भाष्य केलं. राज मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. तशी मागणी केली जात आहे असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राज ठाकरेंनी, “स्वत: बाळासाहेब असते तर त्यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नावं द्या असं सांगितलं असतं,” असं मत व्यक्त केलं. तसेच महाराष्ट्राची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य अशी करुन दिली जाते. त्यामुळे येथे येणारे प्रत्येक विमान हे महाराजांच्या भूमीतच येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आल्यानंतर पुढे काही चर्चेला विषयच राहत नाही, असं राज यांनी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावापुढे कोणाचंही नाव येऊ शकत नाही, असंही राज यांनी यावेळी सांगितलं.

नक्की वाचा >> जाणून घ्या : दि. बा. पाटील कोण होते? नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी का केली जातेय?

प्रशांत ठाकूर भेटीसाठी आले होते…

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आहे. तर बाळासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून संघर्ष होत असून पाठिंबा मागण्यासाठी माझ्याकडे प्रशांत ठाकूर आले होते, असंही राज यांनी सांगितलं.

नामांतरचा वाद दुर्दैवी…

नामांतराचा वाद हेच दुर्दैव आहे. खरंतर विमानतळ लवकर होण्यासाठी राज्य सरकारनं रेटा लावला पाहिजे. नावात वैगेरे सगळे लोकं गुंतून राहतात म्हणून ते सोयीचं असतं. महाराष्ट्रात येणारं विमान शिवाजी महाराजांच्या भूमीत येणार त्यामुळे त्यांचंच नाव असायला हवं, असं राज म्हणाले.

नक्की पाहा >> Photos: नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांऐवजी दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर

बाळासाहेब किंवा दि. बा. पाटील यांच्या मोठपणाबद्दल दुमत नाही

कोणतंही विमानतळ एखाद्या शहरामध्ये येतं तेव्हा ते खरं तर शहराच्या बाहेर येतं. त्यामुळे विमानतळ आधी सांताक्रूझमध्ये आलं, नंतर ते सहारपर्यंत गेलं. नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच नाव राहणार असं मला वाटत आहे. हे काही सिडकोनं मंजूर केलं नी राज्यानं प्रस्ताव केला असं नाही. हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावाने होईल. बाळासाहेब किंवा दि. बा. पाटील यांच्या मोठपणाबद्दल दुमत नाही, असंही राज यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 1:26 pm

Web Title: navi mumbai airport naming issue mns raj thackeray says balasaheb thackeray would have suggested to name after chhatrapati shivaji maharaj scsg 91
Next Stories
1 नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं – राज ठाकरे
2 करोना संपेपर्यंत सर्वसामान्यांना मुंबई लोकल प्रवासबंदी?; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
3 कोविडनंतर पुन्हा लक्षणं दिसल्यास असू शकतो स्वाईन फ्लू; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
Just Now!
X