राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाचा मराठी ऐवजी गुजराती अनुवाद केल्याचे सांगत विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी सभागृहाची माफी मागितली. तरीही विरोधकांचे समाधान झाले नाही. याचदरम्यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तावातावाने विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. हाच धागा पकडत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. मागील अधिवेशनाचा हवाला देत जर मुनगंटीवारांचा घसा बसला तर अर्थसंकल्प कोण मांडणार..मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही हस्तक्षेप करायला हवा होता..तुम्ही एकेकाचा काटा काढत आहात, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना शाब्दिक चिमटे दिले. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

राज्यपालांच्या अभिभाषणात झालेली चूक ही अक्षम्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मराठीत अनुवाद नसल्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अनुवादक म्हणून बसावे लागले. हे अत्यंत गंभीर आहे. दोषींना घरी पाठवले पाहिजे. हे प्रकरण विधी मंडळाच्या कक्षेत येत असले तरी मी माफी मागतो, असे फडवणवीस यांनी म्हटले. परंतु, त्यांच्या या माफीनाम्यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर जयंत पाटील यांनी बोलण्यास सुरूवात केली. आधी मराठी भाषेचा खून करायचा आणि नंतर माफी मागायची हा कसला प्रकार, अशा शब्दांत टीका केली. जयंत पाटलांची ही टीका सत्ताधाऱ्यांना चांगलीच झोंबली.

सुधीर मुनगंटीवार यांनी जयंत पाटलांच्या या वक्तव्याचा समाचार घेत अत्यंत तावातावाने आपली बाजू मांडली. यावर अजित पवार यांनी मुनगंटीवार यांच्या या आक्रमकपणाचा दाखला देत त्यांनी इतक्या तावातावाने बोलायला नको होतं. ते अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मागील अधिवेशनावेळी आपण पाहिले आहे. मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही त्यांना रोखायला हवं होतं. त्यांचा घसा खराब झाला तर अर्थसंकल्प कोण सादर करणार असा सवाल करत मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही एकेकाचा काटा काढत आहात, असा टोला लगावला. पवारांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात हशा पिकला.