यंदाच्या अर्थसंकल्पात मंजुरी

मुंबई : लोकलबरोबरच लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा वाढत जाणारा भार पाहता पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी स्थानकात नवीन टर्मिनस उभारणार आहे. हंगामी अर्थसंकल्पात त्याला मंजुरी मिळाली आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील ४२ पादचारी पुलांसाठी १०० कोटी ८७ लाख, तर मध्य रेल्वेवरील पादचारी पुलांसाठीही ८० कोटी रुपये एवढा निधी मिळाला आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकल गाडय़ांचा वाढता भार पाहता परळ टर्मिनस (लोकलसाठी) उभारले जात आहे. याचबरोबर लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी नवीन पनवेल टर्मिनसचे काम सुरू असून कल्याण टर्मिनस व परळ कोचिंग टर्मिनसची योजना आहे. यानंतर आता पश्चिम रेल्वेने जोगेश्वरीतही नवीन टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यालाही अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

आधीच मध्य रेल्वेच्या पनवेल-कळंबोली येथे टर्मिनस उभारणीचे काम सुरू केले आहे. सध्या पनवेल येथून लोकल सुटतात. टर्मिनस झाल्यास लांब पल्ल्याच्या गाडय़ाही येथूनच सुटतील. या टर्मिनससाठीही अर्थसंकल्पात निधी मिळाला आहे. पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते विरार दरम्यान धिम्या मार्गावर पंधरा डबा लोकल चालवण्यासाठी फलाटांचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामांसाठीही १२ कोटी रुपये अर्थसंकल्पातून मिळाले आहेत. प्रकल्पांची किंमत ही ५९ कोटी रुपये एवढी आहे.

पादचारी पुलांसाठी २०० कोटी

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी पादचारी पूल व रेल्वे हद्दीत येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील पुलांच्या कामांना गती देण्यात आली. अर्थसंकल्पातही पुलांसाठी भरघोस निधी उपलब्ध केला आहे. पश्चिम रेल्वेवर ४२ नवीन पादचारी पूल व जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी ८७ लाख रुपये मंजूर केले आहेत. यात काही पुलांची कामे सुरूही आहेत.

त्याचप्रमाणे चर्नी रोड ते ग्रॅण्ट रोड, एल्फिन्स्टन रोड, मुंबई सेन्ट्रल (दक्षिण दिशा), महालक्ष्मी, दादर, लोअर परळ ते एल्फिन्स्टन रोड असलेल्या उड्डाणपुलांच्या गर्डरच्या कामांसाठीही १८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. मध्य रेल्वेवरही पादचारी पुलांसाठी ८० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

* पश्चिम रेल्वेला आणखी ६६ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मिळाला असून यात चर्चगेट ते विरारमधील ३२ उपनगरीय रेल्वे स्थानकांवर एकात्मिक सुरक्षा प्रणालींर्तगत नवीन सुरक्षा यंत्रणेचाही समावेश आहे. यासाठी २० कोटी रुपये निधी मंजूर आहे. याशिवाय रुळांजवळ संरक्षक भिंत, जाळ्या बसवणे, वांद्रे स्थानकातील हेरिटेज वास्तूसाठी (५ कोटी निधी) निधी.

* पश्चिम रेल्वेवरील ५५ सरकते जिने, १०० लिफ्ट, तिकीट यंत्रणेतील सुधारणांसाठी १४ कोटींपेक्षा जास्त निधी.

* चर्चगेट ते विरार दरम्यान ऑक्झिलरी वॉर्निग यंत्रणा, याचबरोबर मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन यंत्रणाही मंजुर झाली आहे.