मुंबई: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने शिक्षणतज्ज्ञांच्या एका कार्यबल गटाची नियुक्ती के ली आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) माजी कु लगुरू डॉ. वसुधा कामत यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीत  शिक्षण तज्ज्ञांसोबतच प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

या धोरणाचा अभ्यास करून त्याच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारला अहवाल देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने एका कार्यबल गटाची नियुक्ती के ली आहे.  या समितीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे माजी कु लगुरू गणपती यादव, मुंबई विद्यापीठाचे कु लगुरू डॉ. सुहास पेडणेकर, माजी कु लगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि राजन वेळूकर तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कु लगुरू डॉ. विलास  सकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील मराठवाडा वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. भालचंद्र बिराजदार, डी.वाय. पाटील विद्यापीठाचे अजिंक्य पाटील, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अजित जोशी आणि तंत्रशिक्षण संचालक यांचीही वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे या समितीमध्ये प्रख्यात बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांचीही नियुक्ती करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उचांवल्या आहेत. हिरानंदानी यांच्या समूहाची शैक्षणिक संस्था असली तरी ते बांधकाम व्यावसायिक म्हणून परिचित आहेत.