भिडे गुरुजी यांनी माझ्या शेतातला आंबा खाल्ला की अपत्यप्राप्ती होते असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार सोशल मीडियावर सोमवारपासूनच सुरु आहे. अशात नितेश राणे यांनीही एक ट्विट करून भिडे गुरुजींवर टीका केलीये. ”भिडे गुरुजी यांनी त्यांच्या शेतातला आंबे खाल्ले नाही ते बरे झाले नाहीतर त्यांच्यासारखेच सँपल आणखी तयार झाले असते. नशीब आमचे! आंब्यांना उगाच बदनाम करतो आहे.. आमच्या कोकणाची शान आहे.. हे लक्षात ठेवा मग तोंड वाजवा!!” असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. या ट्विटवर अनेकांनी भिडे गुरुजींवर टीकाही केलीये आणि काही नेटकऱ्यांनी भिडे गुरुजींवर टीका केल्याप्रकरणी नितेश राणेंनाही सुनावले आहे.

काय आहे प्रकरण?

संभाजी भिडे गुरुजी यांनी नाशिक येथील एका सभेत बोलताना माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असा दावा केला. आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने जवळपास १५० जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

लग्न होऊन १५ वर्ष झालेल्यांनाही मुलं होतं नाहीत. अशा स्त्री, पुरुषांनी ही फळं खाल्ल्यास त्यांना निश्चित मुलं होतील. मी आतापर्यंत १८० हून जास्त जणांना, जोडप्यांना हे फळ खायला दिलं असून १५० पेक्षा जास्त जणांना मुलं झाली आहेत. ज्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला. भिडे गुरुजींनी महिलांचा अपमान केला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. तर अनेक नेटकऱ्यांनीही भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.