मुंबईतील आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा ५० हजाराच्या पुढे गेला आहे. मंगळवारी १,०१५ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या १ हजार ७५८ झाली आहे, तर ९०४ जण एकाच दिवसात करोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत दरदिवशी दीड हजार रुग्णांची नोंद होत असताना मंगळवारी १०१५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र आणखी ६९० संशयित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. मृत झालेल्या ५८ रुग्णांमध्ये ४० पुरुष आणि १८ महिला होत्या. ४७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत मुंबईत २ लाख ३३ हजार ५७० चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत करोना रुग्णवाढीचा सरासरी दर ३ टक्के आहे. मात्र पश्चिम उपनगरातील मालाड, दहिसर, कांदिवली या भागात रुग्णवाढीचा वेग ५ टक्के आहे. आतापर्यंत २२,९४२ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात १२ हजारांवर रुग्ण

जिल्ह्य़ात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून मंगळवारी जिल्ह्य़ात ५५५ नवे रुग्ण आढळले आहेत.

त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा आता १२ हजार ३५३ इतका झाला आहे. तर, मंगळवारी २१ रुग्णांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्य़ात मंगळवारी ५५५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ठाणे शहरातील १४५, नवी मुंबईतील ८९, कल्याण-डोंबिवली ६८, भिवंडी  ४२, अंबरनाथ  ४५, उल्हासनगर  ४३, बदलापूर  १६, मीरा-भाईंदर ९२ आणि ठाणे ग्रामीणमधील १५ रुग्णांचा समावेश आहे.