प्रवाशांचे हाल, चालकांची भाडेलूट

मुंबई : भाडेदरात वाढ करण्याच्या मागणीसाठी ओला आणि उबरच्या चालक-मालकांनी सोमवारी तीन तास आंदोलन केल्यानंतर दुपारी अचानक बेमुदत बंद सुरू केला. परिणामी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत या सेवेचा वापर करण्यासाठी सरावलेल्या प्रवाशांचे हाल झाले. काही चालक-मालकांनी बंदची संधी साधून अडलेल्या प्रवाशांकडून अवाच्या सवा भाडे घेऊन त्यांची लूट केली.

अचानक पुकारलेल्या बंदमुळे काही ओला-उबर चालकांनी मुंबईत सायंकाळी पाचनंतर भाडेलूट सुरू केली. काहींनी चर्चगेट ते ठाण्यापर्यंत मिनी गाडीच्या भाडय़ापोटी प्रवाशांकडून एक हजार ८०० रुपये वसूल केले, तर काहींनी दादर ते बोरिवलीपर्यंत मायक्रोकारच्या भाडय़ापोटी प्रवाशांकडून ६०८ रुपये घेतले.

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरांत वाढ झाली आहे. मात्र ओला आणि उबरने दरपत्रकात कोणतीही वाढ न करता चालक-मालकांचे प्रति किलोमीटर दर घटविले आहेत. त्यामुळे चालक-मालकांना नुकसान सोसावे लागत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने केला आहे. प्रति किलोमीटर दरात वाढ करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी ओला आणि उबर चालक-मालकांनी कुर्ला येथील उबर कंपनीच्या कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने केली. जवळपास तीन तास आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची कल्पना असल्यामुळे कंपनीने कार्यालय बंद ठेवले होते. त्यामुळे संघटनेने पोलिसांनाच मागण्यांचे निवेदन दिले.

सकाळी आंदोलन सुरू झाल्यानंतरही मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील काही ओला-उबर गाडय़ा सेवा पुरवत होत्या.

दुपारनंतर आंदोलनाची धार तीव्र झाली आणि बहुतांश गाडय़ा जागच्या जागी बंद झाल्या. त्यामुळे ओला-उबर अ‍ॅपवर सेवा उपलब्ध नसल्याचे दिसत होते. सायंकाळी गर्दीच्या वेळी तर ही सेवा मिळण्यात अडचणी येत होत्या. काहींनी बंद आणि गर्दीची संधी साधून प्रवाशांकडून अवाच्या सवा भाडे घेतले.

मागण्या काय?

* ऑनलाइन टॅक्सीचे कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपयांदरम्यान असावे

* प्रति किलोमीटर भाडे १८ ते २३ रुपये करावे ’कंपनीने नवीन गाडय़ा सेवेतून काढून घ्याव्यात ’सध्या धावणाऱ्या गाडय़ांना समान काम द्यावे काही लोकांमुळे आमच्या प्रवाशांची गैरसोय झाली. त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. आम्ही या शहराला सेवा पुरवण्यास कटिबद्ध आहोत. या प्रश्नावर लवकरच तोडगा काढला जाईल. – उबर प्रवक्ता